अहमदनगर (वृत्तसंस्था) मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी सातत्याने लढा देवून आरक्षणाची बाजू लावून धरणारे खासदार छत्रपती संभाजी महाराज यांची दिल्ली येथे खा. रक्षाताई खडसे, खा. प्रितम मुंडे, खा.उन्मेष पाटील, खा.सुजय विखेपाटील व खा.हिना गावित यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी सदिच्छा नुकतीच भेट घेतली.
दिल्लीत भाजपच्या तरुण खासदारांनी मराठा आरक्षणा आपला पाठींबा दर्शविण्यासाठी खासदार छत्रपती संभाजी महाराज यांची भेट घेतली. संभाजी महाराजांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन मराठा आरक्षणासंबंधी मार्ग काढावा, अशी विनंती या खासदारांनी केली. नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पुढाकारातून दिल्लीत भाजपच्या खासदारांचे शिष्टमंडळ संभाजी महाराजांना भेटले. यामध्ये खासदार रक्षा खडसे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, खासदार डॉ. भारती पवार, खासदार डॉ. हीना गावित, खासदार उन्मेष पाटील यांचा समावेश होता. मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. या आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत. खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी पुढाकार घ्यावा. पंतप्रधानांना भेटून या प्रश्नातून मार्ग कसा काढता येईल, याबाबत चर्चा करावी अशी विनंती या शिष्टमंडळाने संभाजी महाराज यांना केली.