हैदराबाद (वृत्तसंस्था) ओवेसी बंधुंच्या एमआयएम पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपला याठिकाणी अवघ्या चार जागा मिळाल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत भाजपने थेट ४९ जागांवर विजय मिळवत हैदराबादमधील राजकीय समीकरणेच बदलून टाकली आहेत. दरम्यान, निकालानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
हैदराबादमधील महानगरपालिकेची निवडणूक असली तरी ती निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेचा विषय बनली होती. हैदराबाद महानगरपालिकेच्या १५० जागांचे निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये पहिल्या क्रमांकावर टीआरएस. दुसऱ्या क्रमांकावर भाजप तर तिसऱ्या क्रमांकावर असदुद्दीन ओवेसी यांचा एमआयएम पक्ष आहे. निकालांनंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली असली तर भाजपनं मात्र या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. दरम्यान, निकालानंतर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. “आम्ही ग्रेटर हैदराबाद म्युनिसिपल कॉर्पेरेशनच्या निवडणुकांमध्ये ४४ जागांवर विजय मिळवला आहे. मी सर्व नगरसेवकांशी चर्चा केली असून त्यांना काम सुरू करण्यासही सांगितलं आहे,” असं ओवेसी म्हणाले. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ताधारी पक्ष टीआरएसवरही भाष्य केलं. “टीआरएसला निकांलांची समीक्षा करण्याची गरज आहे. तेलंगणमधील टीआरएस ही एक चांगला दर्जा असलेला राजकीय पक्ष आहे. ते तेलंगणमधील क्षेत्रीय भावनांचं प्रतिनिधीत्व करतात. के.चंद्रशेखर राव नक्कीच या पक्षाच्या कामगिरीची समीक्षा करतील असा विश्वास आहे,” असं ओवेसी यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं. आम्ही भाजपशी लोकशाही पद्धतीनं लढू. तेलंगणमधील नागरिक भाजपाला त्यांच्या विचारधारेचा विस्तार करण्यापासून रोखतील असा विश्वास असल्याचंही ओवेसी यांनी नमूद केलं.