जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील शिरसोली येथे घरगुती गॅसचा काळाबाजार करून खासगी वाहनांमध्ये गॅस भरण्यासाठी बेकायदेशीररित्या करून ठेवण्यात आलेला गॅस सिलिंडरचा साठा व रिक्षा असा एकूण ५ लाख २९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत जप्त केला. या प्रकरणी सादीक सिराज पिंजारी (वय-४१, रा. शिरसोली प्र.न. ता. जळगाव) याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला ताब्यात घेण्यात आले.
सादीक पिंजारी याने त्याच्या राहत्या घराच्या कुंपनामध्ये विविध कंपनीचे घरघुती व व्यवसायिक गॅस सिलिंडर खासगी वाहनामध्ये गॅस भरण्यासाठी बेकायदेशीररित्या साठा करून ठेवल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. रविवारी २९ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता पथक तेथे पोहचले. त्यावेळी असता गॅस सिलिंडरचा साठा करून ठेवल्याचे आढळून आले. कारवाई करीत तेथून एकूण ७३ घरघुती व व्यावसायिक सिलिंडर तसेच सिलिंडर ठेवलेली रिक्षा (एमएच १९, बीएम २७८४), गॅस भरण्याची मशीन, नळ्या असा एकूण ५ लाख २९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सादीक पिंजारी याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.