मुंबई (वृत्तसंस्था) बंगाली चित्रपटातील अभिनेत्रीला हिंदी चित्रपटात काम देण्याच्या नावाखाली न्यूड फोटो काढून ब्लॅकमेल करणाऱ्या एका कास्टिंग डायरेक्टरला मालाड (Malad) पोलिसांनी अटक केली. ओमप्रकाश तिवारी असे अटक आरोपीचे नाव असून तो २४ वर्षांचा असून तो घरकाम करतो.
तिवारीने स्वत:ला फिल्म इंडस्ट्रीतील एका मोठ्या बॅनरचा कास्टिंग डायरेक्टर म्हणून आपल्या फेसबुक प्रोफाइलमध्ये लिहून, नवीन चित्रपट अभिनेत्रींना चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम करण्याची संधी दिली होती. पण आधी तो त्यांचा अर्धनग्न फोटो काढायचा. मग तो फोटो सोशल मीडियावर टाकण्याच्या नावाखाली तो तरुणीला कास्टिंग काउच करायला सांगायचा किंवा पैसे मागायचा.
पोलिसांनी सांगितले की, एका बंगाली अभिनेत्री डिसेंबर २०२१ मध्ये ऑनलाइन संपर्काद्वारे आरोपीकडे आली होती. त्यानंतर आरोपीने अभिनेत्रीला मुंबईत भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर वेब सीरिज आणि चित्रपटांमध्ये काम देण्याचे सांगत अभिनेत्रीचा ऑडिशनच्या नावाखाली अर्धनग्न फोटो काढला. त्यानंतर काही दिवसांनी आरोपीने अभिनेत्रीला तडजोड करण्यास सांगितले. मात्र मुलीने नकार दिल्याने आरोपीने तिचा अर्धनग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्रीने मालाड पोलिसात तक्रार दाखल केली.
मालाड पोलिसांनी अभिनेत्रीच्या तक्रारीवरून आयपीसी 345A,B, 67A अन्वये गुन्हा दाखल केला असून ४८ तासांच्या आत आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, पीडित तरुणी ही कोलकाता येथील रहिवासी आहे आणि तिने तेथे बंगाली चित्रपटात काम केले आहे. कोरोनाच्या काळात काम उपलब्ध नव्हते, त्यामुळे ती हिंदी चित्रपटात काम करण्यासाठी आरोपीच्या ऑनलाइन संपर्कात आली. या आरोपीने आणखी किती मुलींना चित्रपटात काम देण्याच्या नावाखाली ब्लॅकमेल केले आहे, याचा तपास आता पोलीस करत आहेत.