मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतलेल्या विशेष मुलाखतीचा प्रोमो ट्विटरवर शेअर केला आहे. यावेळी राऊत यांनी ‘उद्या धमाका’ असेही लिहिले आहे.
या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरेंना राऊत काही बोचरे प्रश्न विचारताना दिसत आहेत. या प्रश्नांना मुख्यमंत्री कसे सामोरे जातात, काय उत्तरे देतात त्याची झलक दिसत आहे. ४४ सेकंदांचा हा प्रोमो आहे. संजय राऊत यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना हे सरकार आपल्याच ओझाने पडेल अशी अनेक ज्योतिषं आणि भाकितं वर्तवली जात आहेत अशी विचारणा केली. यासंबंधी उद्धव ठाकरेंनी भाष्य केलेलं दिसत असून असं बोलणाऱ्यांचे दात पडायला आले आहेत असा टोला लगावला आहे. “सूडानेच वागायचं असेल तर तुम्ही एक सूड काढा आणि १० सूड काढू,” असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला आहे. आमच्या अंगावर येणाऱ्यांना ज्यांना ज्यांना कुटुंब, मुलं बाळं आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही धुतळ्या तांदळ्याचे नाहीत. तुमची खिचडी कशी शिजवायची ते आम्ही शिजवू शकतो,” असा इशाराही उद्धव ठाकरे देताना दिसत आहेत. दरम्यान, राऊतांनी ट्वीट केलेल्या या प्रोमोमुळं मुलाखतीची उत्सुकता वाढली आहे.