चाळीसगाव (प्रतिनिधी) ज्या ज्या वेळी असुरी शक्ती एकत्र आल्या त्या त्या वेळी त्यांचा विनाश करण्यासाठी आदिशक्तीनी अवतार घेतला आहे. केवळ आपले राजकीय स्थान अबाधित राहावे यासाठी विचारधारा, निष्ठा, विश्वास गुंडाळून ठेवत अश्याच काही दूषप्रवृत्ती सध्या एकत्र आल्या आहेत. त्यामुळे ग्रामदैवत आनंदा मातेचा आशिर्वाद…चला देऊ विकासाला साथ, असे आवाहन आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी केले आहे. या दुष्ट शक्तींशी लढण्याचे बळ आम्हाला दे, हा आशिर्वाद घेण्यासाठी तसेच महायुतीच्या जळगाव लोकसभेच्या अधिकृत उमेदवार स्मिताताई वाघ यांचा प्रचार शुभारंभ करण्यासाठी आज रामनवमीच्या शुभमुहूर्तावर चाळीसगाव शहराचे ग्रामदैवत आनंदा माता मंदिर येथे प्रचार नारळ वाढविण्यात आले, यावेळी मंगेशदादा बोलत होते.
यावेळी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, रासप, एकलव्य संघटना, मनसे, रयत क्रांती महायुतीचे आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बाजारपेठ, सदर बाजार परिसरातील व्यावसायिक, नागरिक यांच्या भेटी घेऊन त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट करण्यासाठी येत्या १३ मे रोजी कमळ या चिन्हावर मत देण्याचे आवाहन केले. या प्रचार रॅलीला नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून आमचा देखील उत्साह वाढला. आज रामनवमी असल्याने शहरातील राम मंदिर येथे श्रीरामचंद्र यांचे दर्शन घेऊन आशिर्वाद प्राप्त केले. विरोधकांकडे सध्या कुठलाही अजेंडा नसून चाळीसगाव शहरासाठी आपण काय केले हे त्यांना सांगता येत नाहीये. ते विकासाचे व्हिजन मांडत नसून केवळ आणि केवळ मोदींचा विकासरथ कसा रोखता येईल हेच त्यांचे लक्ष आहे. तीन जिल्ह्यांच्या सीमेवरील चाळीसगाव तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असणारे चाळीसगाव शहराच्या विकासाला खऱ्या अर्थाने मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर दिशा मिळाली आहे.
चाळीसगाव शहरातुन गेलेला जळगाव – चांदवड हा सिमेंट काँक्रीट महामार्ग, अमृत भारत योजनेतून अत्याधुनिक सोयी सुविधा युक्त रेल्वे स्टेशन, चाळीसगाव-धुळे रेल्वे विद्युतीकरण, अमृत योजनेतून प्रस्तावित १५० कोटींची गिरणा पाणीपुरवठा योजना, हॉटेल दयानंद जवळील पुलाचे सुरू असलेले बांधकाम व घाट रोड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण, रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या छोट्या दुकानदारांना पीएम स्वनिधी योजनेचे कवच, आदी अनेक विकासकामे सांगता येतील जी केवळ मोदींजींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या माध्यमातून होऊ शकली आहेत. आणि भविष्यात देखील उत्तर महाराष्ट्रातील एक चांगले शहर म्हणून चाळीसगाव शहराला विकसित करायचे असेल तर पुन्हा एकदा केंद्रात बहुमताने मोदी सरकार आणणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन यावेळी केले.