धरणगाव (प्रतिनिधी) धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे आरक्षण मिळावे, या मागणीसाठी येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पुलाजवळ आज येथील धनगर समाजातर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनाला आरक्षणाच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.
सकल धनगर समाजाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गत ७८ वर्षापासून धनगर जमाती एसटी प्रवर्गापासून वंचित आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी व एसटी प्रवर्गात धनगर जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी धनगर समाजाच्या काही जणांनी पंढरपूर व इतर काही ठिकाणी आमरण उपोषणास सुरु केले आहे. त्यांना पाठिंबा जाहीर करण्यासाठी व धनगर समाजावरील अन्याय दूर करण्यासाठी तसेच एसटी प्रवर्गातून धनगर जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर बांधवांनी रास्ता रोको केले.
शासन दरबारी आमचे म्हणणे मांडून धनगर समजाला एसटी प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करून द्यावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली. येथील धनगर समाजाचे अध्यक्ष किशोर धनगर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन पोलीस उपनिरीक्षक वाघ व तहसील कार्यालयात नायब तहसीलदारांना देण्यात आले. या वेळी सचिन धनगर व भडांगे यांनी मनोगत व्यक्त केले. धनगर समाजाचे समाज बांधवांसह शरद कंखरे, राजेंद्र न्हायदे, श्याम धनगर, पप्पू धनगर, अमोल हरपे, नाना धनगर, राजू धनगर उपस्थित होते.