जळगाव (प्रतिनिधी) पिंप्राळ्यातील काशिनाथ केशरलाल सोमाणी फाउंडेशन आणि पिंप्राळा व परिसर माहेश्वरी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात १४ दात्यांनी रक्तदान केले.
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनासह इतर आजारांच्या अनेक रुग्णांना रक्ताची गरज आहे. परंतु, रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवतोय. वेळेवर रक्त उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक रुग्णांची गैरसोय होते. रुग्णाचे नातेवाईक रक्त मिळविण्यासाठी प्रयत्न करताय. पण, अनेक रक्तपेढ्यांमध्येही रक्ताची टंचाई भासतेय. ही बाब लक्षात येताच माहेश्वरी समाजबांधवांनी माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढीच्या सहकार्याने रक्तदान शिबिर घेण्याचा निर्णय घेतला. या शिबिरास कोरोना महामारीच्या बिकट परिस्थितीतही उत्तम प्रतिसाद लाभला. कोरोनासंदर्भातील शासकीय नियमांचे पालन करीत हे शिबिर घेण्यात आले.
यावेळी जिल्हा माहेश्वरी सभेचे सचिव माणकचंद झंवर, जळगाव शहर व तालुकाध्यक्ष योगेश कलंत्री, सचिव विलास काबरा, पिंप्राळा व परिसर माहेश्वरी सभेचे अध्यक्ष विनोद न्याती, सचिव मयूर सोमाणी, तसेच स्व.काशिनाथ केशरलाल सोमाणी फाउंडेशनचे प्रमोद सोमाणी, डॉ. व्ही.के.सोमाणी आदी उपस्थित होते. दरम्यान, माहेश्वरी समाजातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या अगोदर गरजू रुग्णांसाठी अत्यल्प दरात अॉक्सिजन मशीनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आता रक्तदान शिबिर घेऊन या समाजाच्या दातु्त्त्व भावनेचे दर्शन घडले.