धरणगाव (प्रतिनिधी) रक्तदान हेच जीवनदान असून रक्तदानाप्रति जागरुकता वाढवणे जरुरीचे आहे. तसेच गरजूंना वेळेवर, सुरक्षित आणि योग्य रक्त मिळावे यासाठी नेहमी तयार असले पाहिजे. आपण सर्वांनीच रक्तदान करायला हवे, त्यासाठी “अनेक सेवाभावी संस्था, सामाजिक संस्था आणि सामान्य नागरिकांनीही रक्तदानासाठी मोठ्या प्रमाणावर पुढे यायला हवे. असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. तसेच स्व. विठ्ठलराव चव्हाण यांच्या आठवणीना देखील त्यांनी उजाळा दिला. ते धरणगाव तालुक्यातील पथराड खु. येथे स्व. विठ्ठलराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ रेडप्लस सोसायटी व शास्त्री इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबीर उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
स्व. विठ्ठलराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ पथराड खु. येथे श्री हनुमान मंदिर परिसरात रेड प्लस सोसायटी व शास्त्री इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान व रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी 52 रक्तदात्यांनी नाव नोंदणी केलेली होती. प्रत्यक्षात 35 रक्तदात्यांचे रक्त संकलन करण्यात आले.. तर सुमारे 150 व्यक्तींनी रक्तगट तपासणी केली . रक्तगट व रक्तदान शिबिरात संचालक डॉ. राजेंद्र चंद्रहास व त्यांच्या टीमने आलेल्या रक्तदात्यांची तपासणी केली.
यावेळी मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख मुकुंदराव ननवरे, तालुका संघटक रवींद्र चव्हाण सर, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पवार , सरपंच पप्पू पाटील उपसरपंच गजानन पाटील, माजी सरपंच गोकुळ लंके , सुधाकर पाटील, नारायणआप्पा सोनवणे , श्रीकांत चव्हाण , संजय चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण , डॉ. राजेंद्र चंद्रहास, डॉ. उत्पल कुवर यांच्यासह डॉक्टर व रक्तदाते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रम शिबिराचे सूत्रसंचालन भैया मराठे सर यांनी केले तर आभार आयोजक पंकज चव्हाण यांनी मानले.