भुसावळ (प्रतिनिधी) प्रेम संबंधातून माय-लेकावर कोयत्याने वार करण्यात आल्याची खळबळजनक घटना शहरातील पंचशील नगरात मंगळवारी रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास घडली. जीवन लक्ष्मण चौधरी (३०) हा तरुण आणि त्याची आई या हल्ल्यात जखमी झाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीवन याचे एका महिलेशी प्रेमसंबंध होते. त्याचे या महिलेकडे येणे-जाणे होते. मंगळवारी रात्री हा युवक महिलेच्या घरी आला. त्याचवेळी महिलेचा मुलगा व त्याच्या मामाचा मुलगा घरी आला. युवकाला पाहताच त्यांनी त्यास शिवीगाळ केली. यानंतर हा तरुण घरी पायी जात असताना त्याला मच्छी मार्केट येथे गाठले. तेथे जीवन उर्फ गोलू चौधरी (वय ३२) नजरेस पडताच त्याच्यावर देखील कोयत्याने वार केले. तो जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात पडला. चेहरा, कान वा उजव्या हातावर वार केल्याने जीवन हा गंभीर जखमी झाला.
जीवनच्या मागे घरी आल्यानंतर दरवाजाला धडक देत राहूल राजपूत व अन्य एक अशा दोघांनी घरात अनधिकृत प्रवेश केला. राहूलने त्याच्याजवळ असलेल्या कोयत्याने बेबाबाई यांच्या गळ्यावर उजव्या बाजूला तसेच हात, पोटावर वार केले. यामुळे त्या रक्तबंभाळ झाल्या. यानंतर राहूल व साथीदाराने तेथून पोबारा केला. या प्रकरणी जीवन चौधरी याने दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हल्ल्यात जखमी जीवन याच्यावर डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.