बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यात लंपी स्किन या जनावरांना होणाऱ्या आजाराचा सध्या तालुक्यात प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे ऐन कामाच्या दिवसाच शेतकरी हवालदिल व चिंताग्रस्त झालेला पहायला मिळत आहे.
ही परिस्थिती पाहता बोदवड तालुक्यातील पशुधन पर्यवेक्षक प्रशांत पाटील व प्रल्हाद शिंदे या दोघांनी या आजाराचे गांभिर्य लक्षात घेऊन या आजारावर मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज त्यांनी जलचक्र येथे आज जनावरांना लसीकरण केले. याकामी त्यांना पशुधन पर्यवेक्षक शुभम माळी हे सुद्धा मदत करत असून शेतकऱ्यांच्या या पशुधनाच्या मदतीसाठी हे दोनही पशुधन पर्यवेक्षक स्वखर्चाने मोफत लसीकरण करत आहेत. यासाठी आपण त्यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले. आपल्या जनावराच्या काळजीसाठी लवकरात लवकर त्यांचे लसीकरण करुन त्यांना या आजारापासुन दुर ठेवावे, असे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे.