बोदवड (प्रतिनिधी) बोदवड कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या गणित विभागाच्या ४५ विद्यार्थ्यांनी नुकतीच अजिंठा लेणीला भेट दिली. या भेटीत विद्यार्थ्यांनी लेण्यांमधील अद्भुत सौंदर्य,चित्रे व शिल्पांच्या निरीक्षणासोबतच गणित, विज्ञानाच्या दृष्टीकोनातूही लेण्यांचा अभ्यास केला.
या दौऱ्यात विद्यार्थ्यांना आढळले की, अजिंठालेणी दीर्घकाळ टिकावी, छताचे वजन पेलता यावे म्हणून एकसंध उत्कृष्ट घनता असलेल्या अश्या बेसाल्ट खडकात लेणी कोरतांना विविध स्तंभ,वेगवेगळे दरवाजे, निरनिराळया खिडक्या, हवेचे झरोखे, त्यांची संख्या,त्यांचा आकार त्यांची उंची, त्यांची जाडी ,स्तंभावरील दाब,वजन ,बल लक्षात घेऊन केलेली प्रमाणबद्धता घेतांना सखोल विचार केलेला आढळतो . तसेच लेणीमध्ये प्रकाश आत यावा ,हवेचे वायुविजन व्हावे ,योग्य तापमान राहावे ,पावसाच्या पाण्याची साठवण, यासांरख्या गोष्टींच्या त्याकाळात केलेल्या उपाययोजना बघून विद्यार्थी प्रभावित झाले. या भेटीत त्यांनी गौतम बुद्धांनी शोधून काढलेली विपश्यना या शास्त्रीय ध्यानसाधना पद्धतीसाठी तयार करण्यात आलेल्या विविध लेण्यांमधील विविध शिल्पे, विविध शून्यागरे,उच्च प्रतीची जातककथेविषयीची चित्रे, निसर्गरम्य धबधबे यांचे निरीक्षण केले आणि त्या मागील इतिहास समजून घेतला.
आजच्या इंजिनिअरिंग क्षेत्रातील लोकांनाही अचंबित करतील अश्या गोष्टी बघून विद्यार्थ्यांना आपल्या या महान संस्कृती विषयी,समृद्ध शिल्पकलेविषयी, श्रेष्ठ चित्रकलेचा वारसाविषयी आदर वाढला. सदर एकदिवसीय शैक्षणिक सहलीच्या आयोजनासाठी संस्थेचे चेअरमन मिठूलालजी अग्रवाल यांचे प्रोत्साहन लाभले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांचे अनमोल सहकार्य मिळाले. गणित विभागप्रमुख डॉ .रुपेश मोरे यांनी सहलीचे नेतृत्व केले.उपप्राचार्य डॉ. व्ही. पी. चौधरी,सौ. रूपाली चौधरी, भाग्यश्री माटे ,अजय शिंदे, प्रीती पाटील ,चंचल बडगुजर ,आकाश मोरे यांनी परिश्रम घेतले.