बोदवड (प्रतिनिधी) बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेसाठी परिसरातील शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी भोले महाकाल फाउंडेशन व बोदवड परिसरातील शेतकरी यांची बोदवड ते मंत्रालय पायी यात्रेस आज सकाळी प्रारंभ झाला. सकाळी शिवद्वार येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस सामाजिक कार्यकर्ते महेंद्र पाटील व भोले महाकाल फौंडेशनचे अध्यक्ष अनिल गंगतिरे यांनी माल्यार्पण व अभिवादन केले आणि महेंद्र पाटील यांच्या हस्ते तिरंगा ध्वज स्वीकारून यात्रेस सुरवात केली.
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण व अभिवादन करून यात्रा रवाना झाली. तालुक्यातील चार हजारावर शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन घेऊन १३ दिवस पायी चालत जाऊन मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात निवेदन देण्यात येणार आहे. ही योजना लवकरात लवकर पूर्ण होवो. आमच्या शेताला पाणी मिळो व पिण्याच्या पाण्याचे सुद्धा दुर्भिक्ष कमी होवो हा या तरुणाचा उद्देश आहे.१ सप्टेंबर १९९९ रोजी या योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली होती. व्दितीय सुधारित प्रशासकीय मान्यता ४ सप्टेंबर २००८ सर्व शासकीय ४ सप्टेंबर २००८ मिळाली. सर्व शासकीय मान्यता या योजनेला मिळाली. हतनूर धरणाच्या बुडित क्षेत्रातून पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी मुक्ताईनगर गावाजवळील खामखेड पुलाजवळ पूर्णा नदीच्या काठावरुन पंपाद्वारे १९८.५४ ल.घ.मी तेच पाणी जुनोने टाकने तेथून पाईपलाईनद्वारे बोदवड तालुक्यातील जामठीतलावात साठवण करणे.
एकूण क्षेत्र ४२ हजार ४२० हेक्टर जमीन यात ओलिताखाली येणार आहे. त्यात १०१ गावे असून त्यात बोदवड तालुका ४३, मोताळा तालुका १५. जामनेर तालुका १४, मलकापूर तालुका २३ गावे आहेत. या योजनेचा कामाचा शुभारंभ तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यानी ११ जून २०१० रोजी साळसिंगी रस्ता बोदवड येथे केला होता. परंतु अजूनही निधी अभावी ही योजना अपेक्षित वेगाने पूर्ण होत नसल्याने योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्यास विलंब होत आहे. या योजनेस लवकर निधी मिळावा हे निवेदन घेऊन नवीन वर्षाच्या सुरुवातीला बोदवड तालुक्यातील शेतकरी पुत्रांनी ही पायी दिंडी काढली आहे. सुमारे २५ तरुण शेतकरी या दिंडीत सहभागी असून काही शेतकरी पुढे चार पाच दिवसांनी यात्रेत सहभागी होणार आहेत.