बोदवड (प्रतिनिधी) बोदवड शहरातून जाणाऱ्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी समस्या जीवघेणी ठरणार असे दिसत आहे. वाहनांची वाढती संख्या शहरातील अतिक्रमणे, बेशिस्त वाहन चालक या सारख्या बाबींमुळे दिवसेंदिवस ही समस्या गंभीर होत चालली आहे. आज देखील यामुळे तासभर वाहतूक कोंडी झाली होती.
बोदवड शहरातून मुक्ताईनगर कडे जाणारा व मलकापूरकडे जाणारा रस्ता हा कायम वाहतूक कोंडी होणारा रस्ता म्हणून ओळखला जातो. आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास सुरू झालेली वाहतूक कोंडी सुमारे तासाभरानंतर मोकळी झाली. मलकापूर चौफुलीकडून मलकापूर कडे ,मुक्ताईनगर रस्ता, भुसावळ रस्ता या तीनही बाजूस सुमारे एक एक की मी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. फेरीवाले, दुकानासमोर असलेले अतिक्रमण व त्या समोर उभी राहणारी वाहने या मुळे नेहमीच वाहतूक कोंडी होत राहते.
अश्या वाहतूक कोंडीवेळी जर एखादी रुग्ण वाहिका आली तर ती सुद्धा अडकून पडुन रुग्णाच्या जीवास धोका होऊ शकतो.रस्ते विकास महामंडळाचे रस्ते कामावेळी अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली जाईल असे वाटत होते परंतु सध्या सुरू असलेले काम पाहता आहे त्या स्थितीत रस्ता पूर्ण होईल असे वाटत आहे. नागरपंचायत फेरीवाल्यांकडून नियमितपणे कर घेते पण त्यांचे साठी हॉकर्स झोन व्यवस्था करत नाही. त्या मुळे आणखी अडचणीत भर पडते.
पोलीस कारवाई सुरू झाली तर त्यात राजकीय हस्तक्षेप होत असतो त्यामुळे त्या विभागाकडूनसुद्धा जुजबी कारवाया केल्या जातात. अन्यथा नाडगाव येथील उड्डाण पूल पूर्ण झाल्यानंतर आणखी जास्त वाहतूक या रस्त्याने वाढेल त्या वेळेस ही वाहतूक व त्या मुळे जी भविष्यात वाहतूक कोंडी होईल जीवघेणी ठरू शकते. कारण पादचाऱ्यांना चालण्यास जागाच उरत नाही. लहान मुले सोबत असलेल्या पालकांना तर यातून मार्ग काढणे हे संकटच असते. तसेच वाहतूक कोंडी झाली तर अडकलेल्या वाहनांच्या धुरामुळे त्या भागात पादचाऱ्यांना गुदमरल्या सारखे होते. या समस्येवर मार्ग काढण्यासाठी सर्वपक्षीय राजकीय इच्छाशक्ती,वारंवार होणाऱ्या या वाहतूक कोंडीवर नगरपंचायत, महसूल विभाग व पोलीस विभाग यांच्या समन्व्ययातून मार्ग निघू शकतो.















