भुसावळ (प्रतिनिधी) राष्ट्रीय महामार्गावरील साकरी-फेकरी उड्डाणपुलाजवळ १४ एप्रिलला चारचाकी वाहनाचा कट लागल्याच्या वादातून दोन तरुणांवर गोळीबार झाला होता. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. त्यापैकी मुख्य संशयित करण संतोष सपकाळे (रा. खडका, ता. भुसावळ) याला रविवारी दुपारी वरणगावात, तर संतोष शंकर सपकाळे व जीवन रतन सपकाळे (रा. खडका, ता. भुसावळ) यांनाही पोलिसांनी कंडारी गावातील नातेवाइकांच्या घरातून रविवारी मध्यरात्री अटक केली.
१४ एप्रिल रोजी अक्षय रतन सोनवणे (वय २६, भुसावळ) व मंगेश अंबादास काळे (वय २५ भुसावळ) हे दोन्ही अन्य दोघा मित्रांसह कारने (एमएच. १९ – डीव्ही. २०७१) वरणगावकडे जेवणासाठी निघाले होते. दुचाकीला कट लागल्यानंतर संशयितांनी जाब विचारला. त्यातून वाद वाढत गेल्यानंतर संशयित करण संतोष सपकाळे याने कमरेला लावलेले गावठी पिस्तूल काढून दोन गोळ्या झाडल्या. त्यात अक्षय व मंगेश गंभीरपणे जखमी झाले. गोळीबारानंतर करण सपकाळे, संतोष शंकर सपकाळे व जीवन रतन सपकाळे (खडका, ता. भुसावळ) हे संशयित पसार झाले होते.
त्यापैकी करणला वरणगावच्या सानवी हॉटेलजवळ रविवारी दुपारी अटक झाली. तर संतोष व जीवन हे कंडारीतील भिलवाडी प्लॉट भागातील नातेवाइकांकडे आल्याचे कळताच रविवारी मध्यरात्री १ वाजता त्यांना अटक करण्यात आली. सोमवारी या तिघांना न्यायालयात हजर केल्यावर ८ दिवसांची म्हणजेच २४ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकातील हवालदार सूरज पाटील, वासिन पिंजारी, रमण सुरळकर यांनी कारवाई केली. दरम्यान, या पथकाने वरणगाव परिसरातील ग्रामीण भागातील जंगलांमध्येही संशयितांचा दोन-तीन दिवस सलग शोध घेतला. त्यानंतर हवालदार सूरज पाटील यांना संशयित आरोपींची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या.