जळगाव (प्रतिनिधी) दिव्यांग बाबतचे प्रमाणपत्र ४०% वर वाढवून देण्यासाठी पारोळा तालुक्यातील कंकराज येथील रहिवासी असलेलले ४९ वर्षीय दिव्यांगकडून आज चोपडा उप जिल्हा रुग्णालयात लाच स्वीकारतांना दोघांना लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली.
यासंदर्भात अधिक असे की, पारोळा येथील ४९ वर्षीय तक्रारदार हे दिव्यांग असून, दिव्यांग बाबतचे प्रमाणपत्र ४०% वर वाढवून देण्यासाठी त्यांना अनिल तुकाराम पाटील (वय ४६) रा. नागरदेवळा याने डॉक्टर माझ्या ओळखीचे असल्याचे सांगत १० हजाराची लाच मागितली होती. तक्रारदाराने या बाबत लाच लुचपत विभागकडे तक्रार नोंदवली होती. मंगळवारी दुपारी चोपडा उप जिल्हा रुग्णालयात अनिल तुकाराम पाटील याने तक्रारदाराला १० हजारांची लाच मागीतली. लाच स्वीकारल्यानंतर ती विजय रूपचंद लढे (वय -६७, व्यवसाय व्यापार रा. नगरदेवळा) यांच्याकडे सोपवली. लाच लुचपत विभागाच्या पथकाने दोघांना सापळा रचून अटक केली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत श्रीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, स.फौ. दिनेशसिंग पाटील, स.फौ. सुरेश पाटील, पो.हे.कॉ. अशोक अहीरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, पो.हे. कॉ. शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, पो.ना.सुनिल शिरसाठ, पो.ना.जनार्धन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, पो.कॉ. महेश सोमवंशी, पो.कॉ. नासिर देशमुख, पो.कॉ. ईश्वर धनगर, पो.कॉ.प्रदिप पोळ या पथकाने केली आहे.