जळगाव (प्रतिनिधी) जिल्हाधिकारी अमन मित्तल व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया या दोघांची अचानक बदली झाल्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
राज्य शासनाने आज काही आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात जळगाव जिल्ह्यातील अमन मित्तल आणि डॉ. पंकज आशिया यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी अमन मित्तल यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला नसतानाच त्यांची बदली करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांना जळगाव जिल्ह्यात येऊन अवघं एक वर्ष झाले होते. माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता आणि जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्यात वाळू माफियांच्या मुद्द्यावरून खटके उडाले होते. त्यामुळे गुप्ता यांनी मित्तल यांच्या विरोधात राज्य सरकारसह केंद्र पातळीपर्यंत तक्रारी करत बदलीची मागणी केली होती. तसेच प्रामुख्याने वाळूसह शस्त्र परवान्यांबाबतच्या तक्रारींचा समावेश होता.
पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी असलेले आयुष प्रसाद यांची जळगाव जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांची देखील बदली झाली आहे. त्यांना आता यवतमाळ येथील जिल्हाधिकारीपदाची धुरा मिळाली आहे. याबाबतचे आदेश अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी काढले आहेत.