मुंबई (वृत्तसंस्था) ईडीने आज मुंबईत कुर्ला आणि ठाण्यात छापेमारी केली. यादरम्यान मोठी कारवाई करत ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्याला मोठा दणका दिलाय. ईडीने श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातल्या 11 सदनिका सील केल्या आहेत. यात जवळपास 6.45 कोटींच्या संपत्ती टाळा लावण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आलंय.
मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्याला ईडीने मोठा दणका दिला आहे, ठाण्यातल्या 11 सदनिका सील करण्यात आल्या आहेत. श्रीधर पाटणकर ज्यांची ठाण्यातली संपत्ती ED ने जप्त केलीय. यात जवळपास 6.45 कोटींच्या सपत्तीला टाळा लावण्यात आल्याचे ईडीकडून सांगण्यात आलंय. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तामध्ये नीलांबरी प्रोजेक्ट्समधील 11 सदनिकांचा समावेश आहे. या सदनिका साईबाबा गृहनिर्मिती कंपनीच्या नावावर आहेत. साईबाबा गृहनिर्मिती ही कंपनी श्रीधर माधव पाटणकर यांच्या मालकीची आहे. महाराष्ट्रात सध्या ईडी अॅक्टिव्ह मोडवर आहे. पुष्पक बिलीयन फसवणूक प्रकरणात ईडीने हा मोठा दणका दिला आहे. यात ईडीने आधीही कोट्यवधी रुपयांची माहिती सोर आली आहे. यात ईडीने आधीच मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार हा तपास सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ईडीचे धाडसत्र सुरू आहे. यात अनेक मोठ्या कारवाई करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, ईडीची ही कारवाई म्हणजे थेट ठाकरे परिवार ईडीच्या रडारवर आल्याचं मानलं जात आहे. ईडीने 2017 मध्ये पुष्पक बुलियन्सच्या विरोधात मनी लॉंडरिंगचा गुन्हा नोंदवला होता. पुष्पक बुलियन्सची तब्बल 21 कोटी रुपयांची मालमत्ता यापूर्वीच जप्त करण्यात आली आहे. ही मालमत्ता महेश आणि चंद्रकांत पटेल यांच्या मालकीची होती.
ईडीने काय माहिती दिली?
यापूर्वी संचालनालयाने 06.03.2017 रोजी, PMLA, 2002 च्या तरतुदींनुसार, पुष्पक बुलियन आणि समूह कंपन्यांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाची नोंद केली होती आणि आधीच पुष्पक बुलियनची स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. 21.46 कोटी किंमतीच्या महेश पटेल, चंद्रकांत पटेल, त्यांचे कुटुंबातील सदस्य आणि त्यांच्याद्वारे नियंत्रित कंपन्या आहेत. त्यानंतरच्या तपासात असे दिसून आले की महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या संगनमताने पुष्पक ग्रुपच्या मेसर्स पुष्पक रियल्टीचा निधी चोरून नेला होता. मेसर्स पुष्पक रियल्टी डेव्हलपरने विक्रीच्या नावाखाली 20.02 कोटी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या संस्थांना विविध जोडलेल्या/अनकनेक्ट केलेल्या संस्थांद्वारे चोरल्याचे ईडीकडून सांगण्यात आलंय. अनेक शेल कंपन्या चालवणारे नंदकिशोर चतुर्वेदी यांनी त्यांच्या शेल कंपनी मेसर्स हमसफर डीलर प्रायव्हेट लिमिटेड मार्फत जास्त असुरक्षित कर्ज देण्याच्या नावाखाली पैसे हस्तांतरित केले. मेसर्स श्री साईबाबा गृहनिर्मिरी प्रा.ला 30 कोटी महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या संगनमताने काढून घेतलेले, असेही ईडीकडून सांगण्यात आलं आहे.
यापूर्वीही किरीट सोमय्यांनी पाटणकरांवर केले होते आरोप
कर्जत येथील वैजनाथ देवस्थान येथील जमिनीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी गेल्या जानेवारी महिन्यात केला होता. ”वैजनाथ येथील शंकराचे देवस्थान प्रसिद्ध आहे. अशा या देवस्थानची जमीन गैरव्यवहार करून एका सलीम नावाच्या व्यक्तीच्या नावावर केली. त्यानंतर ती जमीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या नावावर करण्यात आली”, असे गंभीर आरोप किरीट सोमय्यांनी केले होते.
भाजपकडून ईडीचा गैरवापर होत असल्याचा आरोप
आतापर्यंत महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांवर तपास यंत्रणांची कारवाई झाली. ईडी कारवाईमुळे महाविकास आघाडीतील एक मंत्री नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख सध्या तुरुंगात आहेत. तसेच शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. संजय राऊतांच्या निकटवर्तीयांची देखील ईडीने चौकशी केली. त्यामुळे ईडी राज्यातील सरकार अस्थिर करण्यासाठी ईडीचा गैरवापर करत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे.