जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे पथक जळगावात ठाण मांडून असल्याचे मोठे वृत्त समोर आलेय. पथकाला जळगावात यायला आज तिसरा दिवस असून कागद पत्रांच्या तपासाच्या दृष्टीने झाडाझडती सुरु आहे. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेचे पथक पुन्हा जळगावात असल्यामुळे संशयितांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरेल आहे.
आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगावात धाड टाकल्यानंतर साधारण २ ट्रकभर कागदपत्र जप्त केली होती. त्या कागदपत्रांचा अभ्यासानंतर पुरावे गोळा करण्याचे काम पूर्ण झाल्याचे कळते. फॉरेंसिक ऑडिटमधून संशयित आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे मिळाले असल्याचे कळते. याच पुराव्यांची लिंक जोडण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचे एक पथक जळगावात दोन दिवसापासून ठाण मांडून बसले आहे. या पथकात २ अधिकारी आणि ३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पथक तपासात समोर आलेल्या कागदपत्रांची तपास करत असून पुरावे अधिक भक्कम करण्याच्या दृष्टीने आणखी काही कागद पत्र मिळतात का?, याचा शोध घेत आहे. तसेच आधी जप्त कागद पत्रांसोबत नवीन कागद पत्रांची काही लिंक जुळतेय का?, याचा देखील शोध पथक घेत आहे. दरम्यान, बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवर गेटअप बदलवून जळगावात येऊन गेल्याची जोरदार चर्चा होती. एवढेच नव्हे तर, झंवर जळगावला येण्यापूर्वी उज्जैन येथे एका महाराजांकडे दर्शनासाठी गेला असल्याचे देखील कळते. आर्थिक गुन्हे शाखेचे काही पथके सुनील झंवर, अवसायक जितेंद्र कंडारे यांचा कसून शोध घेत आहे.