जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा दूध संघातील कथित चोरी आणि अपहाराच्या आलेल्या तक्रारींचा प्राथमिक अभ्यास करून पोलिसांकडून मध्यरात्री गुन्हा दाखल झाल्यामुळे या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. शहर पोलीस स्थानकाचे सपोनि संदीप परदेशी यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.
सपोनि संदीप परदेशी यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 11 ऑक्टोबर 2022 रोजी आमदार मंगेश रमेश चव्हाण (चाळीसगाव) यांनी पोलिस अधिक्षक यांना अर्ज दिला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की, जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ येथुन सुमारे चौदा टन बटर (लोणी) 8 ते 9 टन म्हशीच्या दुधाची भुकटी (निल्क पावडर ) सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये मालाची परस्पर विल्हेवाट लावुन टाकण्यात आलेली आहे. सदरची विल्हेवाट ही जळगांव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाचे चेअरमन, कार्यकारी संचालक काही मोजके कर्मचारी यांनी अंत्यत हुशारीने व नियोजन पद्धतीने लावलेली आहे. सदरचा अर्ज हा सी.आर.पी.सी 154 अन्वये फीर्याद नोंदवावी याबाबत अर्जात नमुद केलेले होते.
तसेच मनोज गोपाळ लिमये (वय 59 वर्ष, धंदा – नोकरी, रा. दुधसंघ कॅंपस जळगाव) यांचा दि.12 ऑक्टोबर 2022 रोजी जबाब नोंदविला असता त्यांचे सांगणे की, ते जळगाव सहकारी दुधसंघ येथे कार्याकरी संचालक म्हणुन सन मार्च 2022 पासुन कार्यरत असुन त्यांच्यावर नियंत्रण हे संचालक मंडळाचे असल्याने दुधसंघाची संपुर्ण जबाबदारी त्यांच्यावर आहे. सदर दुधसंघात शेतकरी यांचेकडून दुध संकलीत करुन दुधापासुन अनेक दुग्धजन्य पदार्थ बनविले जातात. व ते ब्रेडींग करुन ते मार्केटमध्ये वितरीत केले जाते.
दिनांक 8 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री 9.30 वाजता मनोज लिमये यांनी संदिप झाडे, स्वप्निल जाधव, नितिन पाटील, महेद्र केदार यांनी विक्री विभागातील प्रत्यक्ष पांढऱ्या लोण्याचा साठा तपासणीचे निर्देश दिले असता त्यांच्या तपासणीत दिनांक 2 ऑक्टोबर 2022 रोजी 14 टन पांढरे लोणी अंदाजे किंमत 70 से 80 लाख रुपये संघाच्या बाहेर वाई (जि. सातारा) येथे शितगृहात पाठविल्याची नोंद साठा रजिस्टरमध्ये घेण्यात आलेली आहे. परंतु असे प्रत्यक्षात कोणतेही वाहन नमुद साठा घेवुन दुधसंघाचे बाहेर गेलेले नाही. याची इन व आउट गेटमध्ये नोंद नाही, तरी तपासणीत दिनांक 2 ऑक्टोबर 2022 रोजी घेण्यात आलेली नोंद ही खोटी असल्याचे तपसणी पथकाच्या निदर्शनास आलेले आहे. तसेच तपासणी पथकास अभिलेखानुसार 9 मॅट्रीक टन दुध पावडरची तफावत आढळुन आली असुन त्याची कींमत अंदाजे 30 ते 35 लाख रुपये आहे असे एकंदरीत 1 कोटी 15 लाख रुपयेचा अपहार झालेला आहे असे मनोज लिमये याची तक्रारीत नमुद आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपासात समोर आले की, कार्यकारी संचालक मनोज लिमये यांनी या प्रकरणात ज्या कर्मचाऱ्यांना निलंबित केले, त्यांच्या निलंबन आदेशात अपहार नमूद केल्याचे म्हटले आहे. हाच मुद्दा लक्षात घेऊन पोलिसांनी दूध संघाची व शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दूध संघातील जबाबदार संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.
जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाचे कार्यकारी संचालक मनोज गोपाळ लिमये यांनी दिनांक 12 ऑक्टोबर /2022 रोजी दिलेल्या जबाबत अपहार असे दिलेले होते परंतु ते त्यांना दि. 13 ऑक्टोबर 2022 रोजी पुन्हा पोलिस निरीक्षक जळगाव शहर पोलिस स्टेशन यांच्या नावाने लेखी फीर्याद देऊन त्यात त्यांनी अपहार नसुन चोरी झाली बाबत नमुद केले होते. तिन्हीही तक्रारींची प्राथमिक चौकशीमध्ये घेण्यात आलेले जबाब तसेच कार्यकारी संचालक मनोद लिमये यांनी काढलेल्या निलंबन आदेशात प्रथम दर्शनी अनंत अशोक अंबीकर, महेंद्रा नारायण केदार यांनी त्यांच्या नियंत्रणातील विभागात असलेल्या यंत्रणेत फार मोठा गैरव्यावहार व अफरातफर केल्याचे व खोट्या नोंदी केल्याचे आढळून आलेले असून गंभीर स्वरुपाचे गैरवर्तन केले असे निदर्शनास येत आहे.
हे आहे संशयित आरोपी
एंकदरीत दोन्हीही तक्रारदार यांची तक्रारीची चौकशी करून सदर चौकशीत जळगाव जिल्हा सहकरी दुध उत्पादक संघात एकुण 1 कोटी 15 लाख रुपयेचा अपहार दिनांक 8 ऑक्टोबर 2022 चे 21.30 पुर्वी झाला असुन सदरचा अपहार जळगाव जिल्हा सहकारी दुध संघातील निष्पन्न होणाऱ्या सर्व जबाबदार संबंधीतानी संगणमत करुन कट कारस्थान रचुन व खोटे दस्ताऐवज तयार करून जळगाव जिल्हा सहकारी दुधसंघात एकुण 1 कोटी 15 लाख रुपयाची दुध पावडर व लोणीचा अपहार करून जळगाव जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाची व शासनाची फसवणुक करून अपहार केला म्हणुन सरकारतर्फे फिर्याद दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, फिर्यादिसोबत प्राथमिक चौकशीचे सर्व जबाब तसेच आमदार मंगेश चव्हाण व मनोज लिमये यांच्या तक्रारी सोबत जोडण्यात आल्या आहेत.
आतापर्यंत काय काय घडलंय !
जळगाव जिल्हा दूध संघात सहा लाख रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार आमदार तथा दूध संघाचे मुख्य प्रशासक मंगेश चव्हाण यांनी दिली होती. त्यानंतर, दूध संघातील मालाची चोरी झाली असल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी खडसे यांनी करीत जळगाव शहर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. यानंतर आमदार चव्हाण आणि आमदार खडसे यांनी पत्रकार परिषदा घेत एकमेकावर टीका केली होती. दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला नाही. त्यामुळे खडसे यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. हे चोरीचे प्रकरण असून पोलीस दबावाखाली काम करत आहेत. आमदार मंगेश चव्हाण हे संघाचे सभासददेखील नाहीत. त्यामुळे त्यांना माहिती कशी मिळते?, असा प्रश्न उपस्थित केला होता. खडसे यांच्या याचिकेवर आज कोर्ट निकाल देणार असल्याचे कळते.
















