मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना ईडीने समन्स पाठवले असून त्यांना ईडीने सोमवारी चौकशीसाठी बोलावले आहे. कोरोना काळात वैद्यकीय उपकरणं खरेदी प्रकरणात ही नोटीस बजावण्यात आल्याचे कळते.
करोनाकाळात मुंबई पालिकेने उभारलेल्या करोना केंद्रांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. याबाबत त्यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. तसेच याची कॅगद्वारे चौकशी होणार, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती.
चहल यांनी जलसंपदा विभागाचं प्रधान सचिव म्हणूनही काम पाहिलेलं आहे. तसेच आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी मानली जाणाऱ्या धारावी झोपडपट्टीच्या विकासात चहल यांची मोठी आणि महत्त्वाची भूमिका होती. ते धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. ते वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाचे सचिवही होते. तसेच औरंगाबाद आणि ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. याशिवाय त्यांनी म्हाडाचं अध्यक्षपद आणि उत्पादन शुल्क आयुक्त म्हणूनही काम पाहिलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अधिकारी म्हणून इक्बालसिंह चहल यांच्याकडे बघितले जाते.