जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळ्यातील प्रमुख संशयित तथा उद्योजक सुनील झंवरला मुंबई हायकोर्टाने आज दिलासा दिला. मुंबई उच्च न्यायालयात सुनील झंवरने फिर्याद रद्द व्हावी, यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनवाईअंती झंवरला दोन आठवडे अटकेपासून हायकोर्टाने संरक्षण दिले. त्यानुसारला झंवरला आता सेशन कोर्टातून नियमितपणे अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी दोन आठवड्याची संधी मिळाली आहे.
भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्था शाखा घोले रोड पुणेचे व्यवसाय जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, सुनील झंवर, महाविर जैन, सुजित वाणी, धरम साखला,योगेश साखला, विवेक ठाकरे, माहेश्वरी व इतरांनी एकमेकांच्या संगनमताने संस्थेत मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. यातील माहेश्वरी, सुनील झंवर, जितेंद्र कंडारे, प्रकाश वाणी, कुणाल शहा, योगेश साखला हे गुन्हा दाखल झाल्यापासून बेपत्ता आहेत. यातील सुनील झंवर व अवसायक जितेंद्र कंडारे या दोघांना फरार घोषित करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यानुसार दोघांच्या घरावर नोटिसा डकविण्यात आल्या होत्या.
लवकरच झंवर आणि कंडारे या दोघांना फरार घोषित केले जाणार होते. परंतु मुंबई उच्च न्यायालयात सुनील झंवरने फिर्याद रद्द व्हावी, यासाठी दाखल याचिकेवर सुनवाई दरम्यान, हायकोर्टाने झंवरला दिलासा दिला. झंवरला आता दोन आठवडे अटकेपासून संरक्षण दिले आहे. तसेच या दोन आठवड्याच्या आतच सुनील झंवरला सेशन कोर्टातून आपला अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करून घ्यावा लागणार आहे. दुसरीकडे दोन दिवसापूर्वीच सुनील झंवर आणि अवसायक जितेंद्र कंडारे या दोघांच्या शोधार्थ ९ पथके मुंबई,नाशिक,इंदौर, जळगावसह राज्यातील इतर भागात रवाना करण्यात आले असून दोघांचा कसून शोध घेण्यासाठी पोलिसांनी काही ठिकाणी छापेमारी केली होती.
















