जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील आरोपींची बँक खाती, एफडी, कर्ज आणि इतर महत्त्वपूर्ण माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरुद्ध पुणे आर्थिक गुन्हे शाखा कडक कारवाई करणार असल्याचे वृत्त आज सकाळी समोर आले होते. त्यानंतर आज सायंकाळपर्यंत पुणे आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल २२ बँकांना समजपत्र तर ६ बँकांना स्मरणपत्र दिल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
बीएचआर घोटाळ्यातील आरोपींची माहिती देण्याबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही माहिती देण्यास मुद्दाम टाळाटाळ करणाऱ्या जळगावातील काही बॅंका आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आले असल्याची खळबळजनक माहिती आज सकाळी समोर आली होती. बीएचआर घोटाळ्यातील आरोपींचे बँक खाते, एफडी,कर्ज आदी संबंधी माहितीसाठी पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून जळगावातील एसबीआय, कोटक, देवनागरी, जनता, युनियन, पीपल्स आदी बँकेसोबत काही दिवसांपासून पत्रव्यवहार सूरु होते. परंतू बँकांकडून अपूर्ण किंवा चुकीची माहिती पुरवली जात होती. या गोष्टींचा बीएचआर घोटाळ्याच्या तपासावर गंभीर परिणाम होत होता. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेकडून संबंधित बँकांना आज पत्र देण्यात आले. त्यात २२ बँकांना समजपत्र तर ६ बँकांना स्मरणपत्र देण्यात आल्याचे कळतेय.
आर्थिक गुन्हे शाखेचे पथक मागील दोन-तीन दिवसापासून जळगावात ठाण मांडून आहे. या पथकाने मागील दोन दिवसात साधारण ४० ते ५० साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यानंतर आज दिवसभर पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने विविध बँकांमध्ये भेटी दिल्यात. त्यात २२ बँकांना समजपत्र तर ६ बँकांना स्मरणपत्र देण्यात आली. यातील एका बँकेने तात्काळ माहिती दिली. तर काही बँकांनी दोन दिवसात माहिती देण्याचे आश्वासन दिले असून उर्वरित बँकांनी अद्यापही सहकार्य केले नसल्याचे कळतेय.
दुसरीकडे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज दिवसभर जळगावातील विविध शासकीय कार्यालयातील पत्रव्यवहारांसह प्रशासकीय बाबी पूर्ण केल्या. त्यासह आज दिवसभारत अर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने साधारण ५-६ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. साक्षीदारांच्या महत्वपूर्ण जबाबातून महत्वपूर्ण माहिती मिळाली असल्याचेही कळतेय. गुन्ह्याच्या तपासाच्या दृष्टीने आर्थिक शाखेच्या पथकाचा हा जळगाव दौरा महत्वपूर्ण ठरलाय.
विजय वाघमारे
(9284058683)