मुंबई (वृत्तसंस्था) अंधेरी पूर्व पोटनिडणुकीत ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाच्या नेत्या ऋतुजा लटके यांचा मोठ्या मताधिक्क्याने विजय झाला आहे. त्यांना 16 व्या फेरीअंती 58875 मते मिळाली आहेत.
अंधेरी पूर्वचे आमदार दिवंगत रमेश लटके यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. शिवसेनेत फूट पडल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती. त्यामुळे ठाकरे गटाकडून या निवडणुकीसाठी जोर लावण्यात आला होता. तर, दुसरीकडे भाजपने या पोटनिवडणुकीसाठी मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, अचानकपणे त्यांची उमेदवारी मागे घेत असल्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर पटेल समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपविरोधातही घोषणाबाजी केली होती.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गुंदवली मनपा शाळेमध्ये सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात झाली आहे. या मतमोजणीसाठी २०० अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन, राज्य शासनाची विविध खाती, बृहन्मुंबई महानगरपालिका, म्हाडा, महावितरण, प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई मेट्रो, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यासारख्या विविध संस्थांच्या अखत्यारीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणी निकाल – 16 व्या फेरीअंती एकूण मतमोजणी
ऋतुजा लटके -58875
बाळा नाडार -1334
मनोज नाईक – 812
मीना खेडेकर – 1347
फरहान सय्यद – 971
मिलिंद कांबळे – 567
राजेश त्रिपाठी – 1380
नोटा – 11569
एकूण मतमोजणी – 76855