जळगाव (प्रतिनिधी) शहरातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळून कंपनीचे पंधरा लाख रुपये घेवून गणपती नगरकडे जात असतांना पल्सरवर आलेल्या दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर दोघांकडून तब्बल पंधरा लाख रुपये लुटून नेल्याची खळबळजनक घटना आज दुपारी ५ वाजेच्या सुमारास घडली.
या संदर्भात अधिक असे की, प्रभा पॉलीमार नामक कंपनीचे पंधरा लाख रुपये घेवून संजय विभांडिक आणि संजय भावसार हे दोघं जण गणपती नगरकडे जात होते. दुपारी ५ वाजून २० मिनिटांनी पंचमुखी हनुमान मंदिराजवळील पद्मावती मंगल कार्यालयाजवळ अचानक पल्सरवर आलेल्या दरोडेखोरांनी बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला, भावसार व विभांडिक यांनी विरोध केल्यानंतर त्यांच्यात जोरात झटापट झाली. त्यानंतर अज्ञात दरोडेखोरांनी बंदुकीच्या धाकावर दोघांकडून पैशांनी भरलेली बॅग हिसकावत रस्त्यावर पडलेली मोटार सोडून पळ काढला. दुसरीकडे एमआयडीसी पोलिसांनी तपासचक्र फिरवायला सुरुवात केली आहे. दरम्यान, भरदिवसा झालेल्या धाडसी चोरीमुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरलेले आहे. या वृत्ताला एमआयडीसी पोलिसांनी दुजोरा दिला आहे.