मुंबई (वृत्तसंस्था) ‘शिवसैनिकांनो, नव्या चिन्हासाठी तयार राहा’, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे. ऐनवेळी आपल्या हातातून चिन्ह गेल्यास पक्षाचे नवीन चिन्ह घरोघरी पोहोचवण्यास तयार राहा, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केल्या आहेत.
नुकत्याच झालेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले, शिवसेनेतून 40 आमदार फुटल्यामुळे आपले सरकार पडले आहे. आपल्याच पक्षाच्या धनुष्यबाण या चिन्हावर बंडखोर गटाने दावा केला आहे. अशा परिस्थितीत धनुष्य बाण हे निवडणूक चिन्ह काढून घेण्याचा किंवा ते गोठवण्याचा प्रयत्न होणार आहे. कायदेशीर लढाईत दुर्दैवाने अपयश आले तरी गाफील राहू नका, शिवसेनेला जे काही चिन्ह मिळेल ते घरोघरी पोचवण्यासाठी कंबर कसा. शिवसेनेच्या मतदारांमध्ये संभ्रम राहू नये, यासाठी शिवसैनिकांनी कंबर कसण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे प्रवक्ता दीपक केसरकर म्हणाले की, अजूनही वेळ गेलेली नाही. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी उद्धव ठाकरेंनी चर्चा केली तर हे दोन्ही पक्ष एकत्र येतील. महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने हा योग्य निर्णय होईल, असंही केसरकर म्हणालेत.