मुंबई (वृत्तसंस्था) मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादीत जळगाव (मविप्र) या संस्थेचा ताबा मिळवण्यासाठीच्या तीन वर्षापूर्वीच्या एका फौजदारी गुन्ह्यात येत्या ७ जानेवारी पर्यंत गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक या दोघांविरोधात कठोर कारवाई करु नये, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना दिले आहेत.
मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादीत जळगाव (मविप्र) या संस्थेचा ताबा मिळवण्यासाठी २०१८ मध्ये पुण्यात बोलावून चाकूचा धाक दाखवून मारहाण केल्याप्रकरणी अॅड. विजय पाटील यांनी रावेर तालुक्यातील निंभोरा पोलिस ठाण्यात ९ डिसेंबर रोजी माजी मंत्री गिरीश महाजन,सुनील झंवर, रामेश्वर नाईकसह २९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. यावर गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक या दोघांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. जानेवारी २०१८ मध्ये घडलेल्या कथित घटनेवर आता डिसेंबरमध्ये फिर्याद देण्यात आली, असा युक्तिवाद महाजन यांच्या वतीने न्यायालयात करण्यात आला. खंडपीठाने या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ जानेवारीला निश्चित केली आहे. तसेच संबंधित फिर्यादीबाबतची कागदपत्रे दाखल करण्याचे निर्देशही दिले आहेत.