जळगाव (प्रतिनिधी) काँग्रेसचे तत्कालीन जळगाव जिल्हाध्यक्ष प्रा. व्ही.जी. पाटील खून प्रकरणातील मुख्य आरोपी राजू सोनवणे याची औरंगाबाद हायकोर्टाने तब्बल १८ वर्षानंतर निर्दोष मुक्तता केली आहे. (V J Patil Murder Case Jalgaon)
काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष प्रा. व्ही. जी. पाटील हे २१ सप्टेंबर २००५ रोजी नूतन मराठा महाविद्यालयात जात असताना मानराज पार्कजवळ त्यांचा चाकूने भोसकून खून करण्यात आला होता. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी २५ सप्टेंबर २००५ रोजी काँग्रेस कार्यकर्ता राजू माळी व त्याचा शालक राजू सोनवणे तर ६ नोव्हेंबर २००५ रोजी लिलाधर नारखेडे व दामू लोखंडे यांना अटक केली होती.
कोर्टाने ३ फेब्रुवारी २००६ रोजी नारखेडे व लोखंडे यांच्या एफआयआर रद्द केली होती. नंतर सुप्रीम कोर्टानेही हाच निकाल कायम ठेवला होता. तर दुसरीकडे डॉ. जी.एन. पाटील व डॉ.उल्हास पाटील यांना देखील या खटल्यात सहआरोपी करण्यात आले होते. परंतु नंतर जळगाव सेशन्स कोर्टाच्या आदेशाला मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली होती.
माळी व सोनवणे यांच्या विरोधात जळगाव कोर्टात खटला चालू असतांना ६ एप्रिल २००७ रोजी राजू माळी मयत झाला होता. त्यानंतर सोनवणे विरोधात खटला चालू ठेवण्यात आला होता. त्यानंतर नोव्हेंबर २०१४ मध्ये राजू सोनवणे याला जळगाव कोर्टाने आरोपी राजू सोनवणे यास खून करणे व खुनाचा कट रचणे या आरोपांखाली दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
या प्रकरणी औरंगाबाद हायकोर्टात अनेक वर्षापासून सुनावणी सुरु होती. १७ फेब्रुवारी २०२३ रोजी कोर्टाने राजू चिंतामण सोनवणे (माळी) याची निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्याची संक्षिप्त ऑर्डर न्यायालयाच्या वेबसाईटवर आली आहे. संपूर्ण ऑर्डर समोर आल्यावरच कोर्टाने निकालात नेमकं काय म्हटलंय?, हे समजू शकेल.
या खटल्यात सीबीआयने चार्जशीट दाखल केले होते. त्यात ४६ साक्षीदार होते. त्यातील तीन प्रत्यक्षदर्शी होते. परंतू बहुतांश साक्षीदारांनी मयत राजू माळी यांना ओळखले होते. राजू सोनवणे यांना कुणीही घटनास्थळी बघितले नव्हेत. एक प्रत्यक्ष साक्षीदाराची साक्ष ही विश्वासर्ह नव्हती. त्यामुळे कोर्टाने सबळ पुराव्या अभावी राजू सोनवणे यांची निर्दोष मुक्तता केली आहे. दरम्यान, राजू सूर्यवंशी यांना विधी सेवेकडून वकील देण्यात आले होते. साधारण २०१५ पासून या खटल्याची सुनावणी सुरु होती.
अॅड. एस.एस.काजी (औरंगाबाद)
कोर्टाची ऑर्डर १७ फेब्रुवारीला आली आहे. राजू सोनवणे यांची निर्दोष मुक्तता झाल्याचे त्यात म्हटले आहे. परंतू पूर्ण ऑर्डर एक-दोन दिवसात साईटवर येईल, त्याचवेळी नेमकं कोर्टाने म्हटलं आहे, ते सांगता येईल.
अॅड. एस.के.कौल ( जळगाव)