पुणे (वृत्तसंस्था) पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं धाड मारली आहे. दरम्यान, ९ लाख रुपयांच्या लाच प्रकरणात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपचे स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
आज स्थायी समितीची बैठक असल्याने महापालिकेत ठेकेदारांची देखील मोठ्या संख्येने गर्दी होती. दरम्यान, बैठक संपताच एसीबीच्या पथकाने कारवाई केल्याने, एकच खळबळ माजली. मनपाच्या इमारतीत पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जवळपास तासभरापासून एसीबीचे अधिकारी तेथील कागदपत्रांची तपासणी करत असल्याची देखील माहिती समोर आली आहे.
स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे चौकशीसाठी एसीबीच्या ताब्यात तर मुख्य लिपिक ज्ञानेश्वर पिंगळे, लिपिक विजय चावरीया, कॉम्प्युटर ऑपरेटर राजेंद्र शिंदे आणि शिपाई अरविंद कांबळे यांना एसीबीकडून अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या सर्वांना आता पुण्याच्या दिशेनं नेण्यात आलं आहे.
स्थायी समितीचं कार्यालयही बंद
एसीबीच्या अधिकाऱ्यांनी स्थायी समितीचं कार्यालयही बंद केल्याची माहिती मिळत आहे. या कारवाईवेळी दोन ठेकेदार स्थायी समितीच्या कार्यालयातच अडकल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, स्थायी समितीची बैठक असल्यामुळे महापालिका परिसरात आज मोठी गर्दी होती. या कारवाई दरम्यान, एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत किती रक्कम जप्त केली, याची माहिती मिळू शकलेली नाही. तर, नोटांची मोजदाद अजून सुरु असल्याचं कळतंय.