श्रीनगर (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरमधून मोठी बातमी समोर आली आहे. काश्मीरच्या पहलगाम येथील चंदनवाडी परिसरात जवानांची एक बस दरीमध्ये कोसळली. पहलगामच्या बेताब खोऱ्यात ही दुर्घटना घडली. या बसमध्ये 39 जवान होते. दुर्घटनेत अनेक जवानांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
ITBP ने दिलेल्या माहितीनुसार, 39 कर्मचारी (ITBP मधील 37 आणि JKP मधील 2) घेऊन जाणारी सिव्हिल बस रस्त्याच्या कडेला असलेल्या नदीच्या पात्रात कोसळली. बसचे ब्रेक फेल झाल्याने ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. हे जवान चंदनवारीहून पहलगामकडे निघाले होते. प्रकरणात घातपाताची भीती व्यक्त केली जात आहे. चंदनवाडी हे पहलगामपासून 16 किमी दूर अंतरावर आहे. सध्या अमरनाथ यात्रा संपलेली आहे. त्यामुळे इथं तैनात असलेले जवान परत येत होते.
आयटीबीपीच्या वाहनाच्या अपघातात सहा जवानांच्या मृत्यूची पुष्टी झाल्याचे बचाव पथकाच्या पथकांनी सांगितले आहे. मृत जवानांची संख्या 10 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. घटनास्थळी युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. या भीषण अपघातात अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत.