वर्धा (वृत्तसंस्था) मेडिकल एजन्सी व औषधी विक्री केंद्र तपासणीचा अहवाल सकारात्मक देण्याकरिता औषधी निरीक्षकाने दहा हजारांच्या लाचेची मागणी केली. त्यानंतर मध्यस्थाच्या मदतीने सात हजारांची लाच स्वीकारली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई बुधवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूरच्या पथकाने केली. प्रशासन विभागाचे औषध निरीक्षक सतीश हिरसिंग चव्हाण (वय ४८, रा. वर्धा) आणि प्रवीण यादवराव पाथरकर (४६, रा. केळकरवाडी), असे संशयितांची नावे आहेत.
तक्रारकर्ता हे शहरातील स्नेहल नगर भागातील रहिवासी आहेत. तक्रारदार यांची मेडिकल एजन्सी व औषधी विक्रीचा व्यवसाय असून सतीश हिरसिंग चव्हाण हे निरीक्षणाकरिता आले होते. निरीक्षणाचा अहवाल तक्रारदार यांच्या बाजूने सकारात्मक तयार करण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केली. गैअर्जदार प्रवीण यादवराव पाथरकर यांच्यावतीने रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवून ताडजोडीअंती सात हजार रुपये गैरअर्जदार प्रवीण यादवराव पाथरकर यांनी शासकीय पंचासमक्ष स्वतः स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.
सतीश हिरसिंग चव्हाण व प्रवीण यादवराव पाथरकर यांना ताब्यात घेण्यात आले. वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. ही कारवाई लाचलूचपत विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर नागपूर परिक्षेत्र, नागपूर, अप्पर पोलीस अधीक्षक, संजय पुरंदरे, पर्यवेक्षण अधिकारी अनामिका मिर्झापूरे यांच्या मार्गदर्शनात सापळा व तपासी अधिकारी प्रीती शेंडे (नागपूर) सापळा कारवाईत सचिन मत्ते, पोलीस निरीक्षक, नीलेश उरकुडे, जमादार भरतसिंग ठाकूर, भागवत वानखेडे, दीपाली भगत, चालक सागर देशमुख यांनी केली.