छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) तपास अधिकारी आपल्या परिचयाचे असून, दाखल गुन्ह्याच्या तपासात सहकार्य करण्यासाठी ३० हजारांची लाच मागणाऱ्या वकिलाविरुद्ध शनिवारी (दि. १९) अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल सांडू भगत (रा. रवी निवास, छत्रपती संभाजीनगर) असे गुन्हा दाखल वकिलाचे नाव आहे. छत्रपती संभाजीनगर विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. या प्रकरणातील तक्रादार यांच्यावर अंबड पोलीस ठाण्यात कलम ४९८ नुसार गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाच्या तपास करणारे अधिकारी माझ्या परिचयाचे आहेत व तपास अधिकारी यांनी तुमच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यामध्ये तुमच्या पत्नीचा पुरवणी जबाब न नोंदविण्यासाठी तसेच गुन्ह्याचे तपासमध्ये सहकार्य करण्यासाठी वकील राहुल भगतने तक्रारदारास तीस हजारांची लाच मागितली होती.
लाचलुचपत विभागाने १२ ऑगस्ट रोजी न्यायालयासमोर सापळा रचला. मात्र, भगतला संशय आल्याने तो तेथून लाच न घेताच निसटला. दरम्यान, या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित वकील राहुल भगतविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एसीबीचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी संगीता पाटील यांनी ही कारवाई केली.