एरंडोल (प्रतिनिधी) अतिरीक्त दिलेल्या बारदानापोटी तडजोडीअंती पाच हजारांची लाच मागून ती स्वीकारताना एरंडोल तहसील कार्यालयातील शासकीय धान्य गोदाम व्यवस्थापक तथा अव्वल कारकून नंदकिशोर रघुनाथ वाघ (47, श्रीराम कॉलनी, बालाजी शाळेच्या मागे, एरंडोल) व मुकादम हमजेखान महेमुदखान पठाण (39, सैय्यद मोहल्ला मारवाडी गल्लीच्या मागे, एरंडोल) यांना अटक करण्यात आली. जळगाव एसीबीच्या पथकाने विधानसभा निवडणुकीच्या धामधूमीत बुधवार, 13 रोजी केलेल्या कारवाईनंतर लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
असे आहे लाच प्रकरण
जळगावातील 47 वर्षीय तक्रारदार यांना शासकीय गोदामातून बारदान (रिकाम्या गोण्या) विकत घेण्याचे कंत्राट जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडून मिळाले आहे. नंदकिशोर वाघ हे शासकीय धान्य गोदाम, एरंडोलचे गोडावून कीपर आहेत व कंत्राटदार मुकादम पठाण यांनी 700 अतिरिक्त बारदान तक्रारदाराला देत सात हजारांची लाच मागितली व लाच न दिल्यास तुझा कंत्राट रद्द करू व भविष्यात कंत्राट मिळू देणार नाहीत, असे सांगितल्यानंतर तक्रारदाराने जळगावात एसीबीकडे तक्रार नोंदवली. लाच पडताळणीदरम्यान संशयीतांनी पाच हजारांची लाच स्वीकारण्याचे मान्य केले व पठाण यांनी बुधवारी दुपारी पाच हजार रुपये स्वीकारताच सुरूवातीला त्यांना व नंतर वाघ यांना अटक करण्यात आली. संशयीतांविरोधात एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
ही सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, राकेश दुसाने आदींच्या पथकाने यशस्वी केला.