नाशिक (वृत्तसंस्था) औद्योगिक वसाहतीतील श्रमिकनगर भागातील शामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालयाचे दोन शिक्षक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले. एसीबीच्या पथकाने संशयितास पावती न देता ठरलेल्या रकमेपैकी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या उपशिक्षकास रंगेहात पकडले आहे. सुभाषचंद्र कौशलप्रसाद मिश्रा (वय ५६) व दिनेशकुमार जमुनाप्रसाद पांडे (वय ५७) अशी लाचखोर शिक्षकांची नावे असून, मिश्रा शामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालयात मुख्याधापक, तर पांडे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे.
दोन मुलांसाठी प्रत्येकी आठ हजार रुपयांची लाचेची मागणी !
याप्रकरणातील तक्रारदार यांची दोन मुले सातपूर येथील महानगरपालिकेच्या मराठी माध्यम शाळेत सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहेत. मात्र, तक्रारदार हे मूळचे बिहार येथील हिंदी भाषिक असल्याने मुलांना हिंदी बोलीभाषेच्या अडचणीमुळे मराठी माध्यमात शिक्षण घेणे अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी गेल्या २९ एप्रिल रोजी श्रमिकनगर येथील शामलाल गुप्ता हिंदी माध्यमिक विद्यालयात जाऊन प्रवेशाविषयी चौकशी केली असता त्यांच्याकडे लाचेची मागणी करण्यात आली होती. मुख्याध्यापक मिश्रा व उपशिक्षक पांडे यांना भेटून त्यांनी प्रवेश देण्याबाबत विनंती केली. मात्र, संशयितांनी त्यांना दोन मुलांसाठी प्रत्येकी आठ हजार रुपये अशी सोळा हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. संशयितांनी ही रक्कम इमारत निधीच्या नावाखाली मागितली. मात्र, त्याची कोणतीही पावती मिळणार नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला.
एसीबीच्या पथकाने शनिवारी रचला सापळा !
एसीबीच्या पथकाने शनिवारी (दि.११) सापळा लावला. यावेळी तक्रारदाराने पुन्हा त्यांच्या मुलांचे शाळा प्रवेशासाठी मुख्याध्यापक मिश्रा व उपशिक्षक पांडे यांची भेट घेतली असताना त्यांनी पंचांसमक्ष इमारत निधीच्या बहाण्याने सोळा हजार रुपयांची मागणी करून त्याबाबत कुठल्याही प्रकारची पावती देण्यास नकार दिला, तसेच पहिला हप्ता म्हणून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारली. ही लाच उपशिक्षक पांडे याने स्वीकारताच त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून, याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. ही कारवाई अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर व अपर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विश्वजीत जाधव, हवालदार प्रणय इंगळे, सुनील पवार, सचिन गोसावी व पोलीस नाईक दीपक पवार आदींच्या पथकाने केली.