छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) लाचखोर किती निर्दावलेत याचा उत्तम नमूना सिल्लोड तालुक्यात बघायला मिळाला. सोलार सर्वे करून देण्यासाठी महावितरणचा टेक्निशियन (तंत्रज्ञ) गणेश सांडू काकडे (३२, रा. वांगी, भराडी, ता. सिल्लोड) याने दोन हजार रुपये मागितले. तडजोडीअंती चक्क ‘फोन पे’वर एक हजार रुपयांची लाच स्वीकारली. याप्रकरणी एसीबीच्या पथकाने आरोपीला पकडले असून त्याच्याविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे शेतकरी आहेत. त्यांनी केहऱ्हाळा (ता. सिल्लोड) येथील शेतातील पाणी उपसा पंपासाठी शासकीय सोलार पॅनल मिळावा म्हणून महावितरण कार्यालयात अर्ज केला होता. हा अर्ज आरोपी तंत्रज्ञ गणेश काकडे याच्याकडे आला. त्याने सोलार सर्वे (जिओ टॅगिंग) करून दिल्यास तक्रारदार यांना सोलार पॅनल मिळण्याची प्रक्रिया झाली असती. मात्र, काकडेने तक्रारदारांचा अर्ज रोखून धरला. त्यामुळे तक्रारदार काकडेकडे गेले. त्यांना सोलार सर्वे करून देण्याची विनंती केली. तेव्हा काकडेने दोन हजारांची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी एसीबीकडे धाव घेतली. एसीबीचे पोलीस निरीक्षक विजय वगरे यांच्या पथकाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली तेव्हा काकडेने तडजोडीअंती ‘फोन पे’वर १ हजार रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले
खिशात ५५० रुपये
एसीबीचे अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक मुकुंद आघाव, उपअधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय वगरे, अंमलदार अशोक नागरगोजे, साईनाथ तोडकर, ताटे यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्यांनी आरोपी गणेश काकडेची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे १० हजारांचा मोबाइल आणि खिशात ५५० रुपये आढळले. हा मुद्देमाल जप्त करण्यात आला.