धुळे (प्रतिनिधी) स्वतःसह मुलीचे जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी तडजोडीअंती ८ लाखांची रक्कम मागितल्याची बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीतून समोर आल्याने तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई जळगावच्या पथकाने धुळ्यात शुक्रवारी केली. अनिल पाटील (कनिष्ठ लिपीक, अनुसूचीत जमाती जात पडताळणी समिती कार्यालय, धुळे वर्ग-3), निलेश अहीरे (समिती सदस्य, अनुसूचीत जमाती जात पडताळणी समिती कार्यालय, धुळे वर्ग-1 आणि राजेश ठाकुर (कनिष्ठ लिपीक, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कार्यालय,नाशिक वर्ग – 3) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.
यावल तालुक्यातील फैजपूर येथील तक्रारदार हे अनुसुचित जमाती प्रवर्गातील आहेत. स्वतःचे आणि त्यांच्या मुलीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी प्रकरण सादर केलेले होते. गेल्या १९ वर्षापासून कागदपत्रांचा पाठपुरावा करुनही फिरवाफिरव केली जात होती. प्रमाणपत्रासाठी १० लाखांची मागणी केली होती. गेल्या 19 वर्षापासुन वारंवार सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा करुन देखील तक्रारदारास त्यांच्या स्वतःच्या व त्यांच्या मुलीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालय मुंबई येथे रिट पिटीशन दाखल केले होते. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने अनुसूचीत जमाती जात पडताळणी समितीला सदर दोन्ही जात वैधता प्रमाणपत्राचा निकाल देण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी देण्याबाबत निकाल दिला होता.
सदर न्यायालयाची प्रत जात पडताळणी समिती कार्यालय धुळे येथे जमा केल्यानंतरदेखील सदर प्रकरणांचा निकाल न दिल्याने तक्रारदार हे कार्यालयातील कनिष्ठ लिपीक अनिल पाटील यांना भेटले असता त्यांनी तक्रारदारास दुसऱ्या दिवशी बोलावून घेत त्यांच्या व त्यांच्या मुलीचे असे दोन्ही जात वैधता प्रमाणपत्र सदस्य समितीकडून काढून आणुन देण्यासाठी सदस्य समितीतील मेंबरची नावे सांगुन एका प्रमाणपत्राचे प्रत्येकी पाच लाख रुपये याप्रमाणे दोन जात वैधता प्रमाणपत्राचे एकुण दहा लाख रुपये लाचेची मागणी केली. निलेश अहिरे या समिती सदस्याने तक्रारदाराच्या जात वैधता प्रमाणपत्रचे काम करून देण्यासाठी तक्रारदाराकाडे कनिष्ठ लिपीक राजेश ठाकुर यास मध्यस्थी टाकून त्यांच्या मार्फतीने तक्रारदाराकडे आठ लाख रुपयांची मागणी केली. यानंतर तक्रारदार यांनी जळगाव एसीबीकडे तक्रार दिली. तिघांविरुद्ध धुळे शहर पोलीस स्टेशनला 30 डिसेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळा अधिकारी पो.नि.संजोग बच्छाव यांंच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.जाधव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, हे.कॉ. रवी घुगे, अशोक अहिरे, पो.ना.बाळु मराठे, पो.ना. सुनील वानखेडे, पोना. ईश्वर धनगर, पो.कॉ. प्रणेश ठाकूर आदींनी या सापळा कारवाईत सहभाग घेतला.















