जळगाव (प्रतिनिधी) भारत निवडणूक आयोगामार्फत दिनांक १ जानेवारी, २०२१ या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरु करण्यात आलेला असुन या अंतर्गत, १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर, २०२० या कालावधीत वयाची १८ वर्षे पूर्ण झालेले नागरीक किंवा ज्यांची अद्याप मतदार म्हणून केलेली नाही असे वंचीत नागरीक हे पदनिर्देशित ठिकाणी नमुना-६ अर्ज भरुन मतदार म्हणून नोंदणी करु शकणार आहे.
एकापेक्षा अधिक ठिकाणी नावाची नोंद असल्यास, किंवा कायमस्वरुपी स्थलांतरीत किंवा मयत मतदारांचे नाव वगळणेसाठी नमुना-७ अर्ज भरता येईल, नमुना-८ अर्ज भरुन आपल्या तपशिलामध्ये काही त्रुटी असल्यास त्यात दुरुस्ती करता येईल. नमुना-८ अ अर्ज भरुन विधानसभा मतदार संघाअंतर्गत आपला पत्ता बदलता येईल. नागरीकांना www.nvsp.in या संकेतस्थळावरुन देखील विहित नमुन्यात ऑनलाईन दावे व हरकती दाखल करता येतील. सदर दावे / हरकती ५ जानेवारी, २०२१ पर्यंत निकालात काढण्यात येणार असून, दिनांक १५ जानेवारी २०२१ रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार आहे. यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर एकूण ३५८७ मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या भागनिहाय संपर्कासाठी यादी Jalgaon.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. असे अभिजीत राउत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.