चाळीसगाव (प्रतिनिधी) रक्षाबंधनाच्या दिवशीच भावाचा मृत्यू वार्ता आल्यामुळे राखी खरेदी करून भाऊची वाट बघणाऱ्या बहिणीने काळीज चिरणारा आक्रोश केला. तमगव्हाण येथील तरुण शुभम पाटील (वय २६, रा. तमगव्हाण), असे मयत तरुणाचे नाव आहे.
तमगव्हाण येथील तरुण शुभम पाटील (वय २६) हा बुधवारी सकाळी कुणाला न सांगता घरातून निघाला. त्याच्या बहिणीने गावात राखी न घेता त्याच्यासाठी चाळीसगावातून राखी आणली होती. मात्र बुधवारी सायंकाळी त्याच्या रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची वार्ताच कानी आली आणि सारेचजण सुन्न झाले. शुभम पाटील या तरुणाने रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली होती. त्याच्या आत्महत्येस कारणीभूत गावातीलच एकावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी. या मागणीसाठी मृत तरुणाचे नातेवाईकांसह रयत सेना व भाजपने शहर पोलिस स्टेशन समोर ठिय्या देत आंदोलन केले.
तमगव्हान ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मृत शुभम याचे वडिल अरूण पाटील यांचे पॅनल व संजय सानप याचे पॅनल समोरासमोर ठाकले होते. त्यात अरूण पाटील यांच्या पॅनलची सरशी झाली. त्यामुळे लक्ष्मण उर्फ संजय आनंदा सानप हा राजकिय द्वेशातुन सतत अरुण पाटील व त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देत होता, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
यावेळी प्रांताधिकारी प्रमोद हिले यांच्या समक्ष, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदिप पाटील यांनी आरोपीला अटक करून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शुभम पाटील याच्यावर तालुक्यातील तमगव्हाण येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. भाजप शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील व रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार माजी सरपंच किशोर पाटील, सरपंच धनराज पाटील यांनी गुरुवारी धरणे आंदोलन केले.