अमरावती (वृत्तसंस्था) मुलगा व सुनेच्या भांडणात आई मध्यस्थी करायला आलेल्या आईच्याच छातीत लोखंडी सळाख भोसकून मुलाने खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना बुधवार, १ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास शहरातील गाडगेनगर परिसरात घडली. सीताकौर रमेशसिंग बावरी (वय ५०, रा. गाडगेनगर) असे मृतक तर नरसिंग रमेशसिंग बावरी (वय ३५ रा. गाडगेनगर) असे आरोपीचे नाव आहे.
नरसिंग हा पत्नी रजनी (२८) यांना नेहमी मद्य प्राशन करून छोट्या-मोठ्या कारणावरून शिवीगाळ व मारहाण करीत होता. बुधवारी रात्री नरसिंगने मद्य प्राशन करून घरी आल्यावर जेवणातील भाजीच्या कारणावरून पत्नी रजनी यांच्यासोबत वाद घातला. या वादा त्याने रजनी यांना मारहाण केली. इतकेच नव्हे, तर घरातील लोखंडी सळाख हातात घेऊन तुला आज मारूनच टाकतो, असे म्हणत तो अंगावर धावून गेला. त्यामुळे त्याची आई सीताकौर ह्या भांडणात मध्यस्थी करायला गेल्या. त्यावर संतापात नरसिंगने आई सीताकौर यांच्या छातीत लोखंडी सळाख भोसकून त्यांची हत्या केली.
शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या घटना लक्षात आल्यावर सीताकौर यांना रक्तबंबाळ अवस्थेत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी रजनी यांनी मोर्शी ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी नरसिंगविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. पुढील तपास ठाणेदार श्रीराम लांबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल रणखांब करीत आहेत.