नाशिक (वृत्तसंस्था) प्रेयसी दुसऱ्या कोणासोबत मोबाइलवरून चॅटिंग करीत असल्याचा राग आल्याने संतप्त प्रियकराने ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून प्रेयसीचा निर्घृण खून केल्याची घटना सोमवारी (दि. २२) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. धक्कादायक म्हणजे प्रियकराने आपल्या मित्राच्या मदतीने मृतदेह अंबड येथून दुचाकीवरून रासबिहारी लिंकरोड येथील मोकळ्या जागेत फेकून पळ काढला होता. याप्रकरणी पोलिसांनी संशयितास बेड्या ठोकल्या असून पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर चिवदास तडवी (वय २१, रा. अंबड, मूळ रा. नंदुरबार) असे संशयिताचे नाव आहे.
मंगळवारी (दि. २३) सकाळी प्रियंका विरजी वसावे (वय १९, मु. पाटबारा, ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) हिचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत संशयित प्रियकरास शिताफीने सागर तडवी याला ताब्यात घेत बेड्याा ठोकल्या. प्रियंका औरंगाबाद नाक्यावरील एका नर्सिंग कॉलेजमध्ये परिचारिकेचे प्रशिक्षण घेत होती. प्रियंका व सागर यांची जुनी मैत्री होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते.
सोमवारी (दि. २२) दुपारी प्रियंका अंबड येथे सागरच्या घरी गेली होती. त्यानंतर रात्री पुन्हा त्याला भेटण्यासाठी गेली असताना रात्री १ वाजेच्या सुमारास प्रियंका मोबाइलवर अन्य कोणाशी चॅटिंग करीत असल्याचा संशय सागरला आला. या कारणावरून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. संतप्त झालेल्या संशयित सागरने प्रियंकाचा ओढणीच्या साहाय्याने गळा आवळून खून केला. त्यानंतर भानावर आलेल्या सागरने आपल्या मित्राच्या मदतीने प्रियंकाचा मृतदेह दुचाकीवरून उड्डाणपूलमार्गे बळीमंदिर येथून रासबिहारी लिंक रोडवरील मिराद्वार लॉन्सशेजारील मोकळ्या जागेत फेकून दिला.
मंगळवारी (दि.२३) सकाळी १० वाजेच्या सुमारास येथून जाणाऱ्या एका नागरिकास, याठिकाणी मृतदेह आढळून आल्याने ही घटना उघडकीस आली. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणावरून पोलीस पथक संशयित सागर तडवी याच्या अंबड येथील घरी पोहोचले. त्यास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खून केल्याची कबुली दिली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.