नागपूर (वृत्तसंस्था) कन्हान नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील बोरडा शिवारात असलेल्या टोल नाक्याजवळील बेंचवर मंगळवारी (दि. १०) दुपारी ३ वाजेच्या सुमारास एका तरुणाला काठ्यांनी जबर मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली. पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने मृतदेह मध्य प्रदेशात नेला. मात्र, काही तासात खून झाल्याचे उघड झाले आणि पोलिसांनी मृतदेह मध्य प्रदेशातून ताब्यात घेतला. आशिष दिलीप पाटील (२७, रा. न्यू गोंडेगाव, ता. पारशिवणी) असे मृताचे नाव आहे. आशिष पारशिवणी पोलिस ठाण्यात होमगार्डपदी कार्यरत होता.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ लगत असलेल्या बोर्डा शिवारातील बसस्टॉपवर मंगळवारी दुपारच्या सुमारास काही जणांना रक्ताचे ओलसर डाग मोठ्या प्रमाणात दिसले. त्यांनी तत्काळ पोलिसांना याची सूचना दिली. त्या आधारे कन्हान पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. रक्त व्यक्तीचे असल्याने त्या आधारावर त्यांनी तपास सुरू करून याची माहिती पोलीस विभागाला दिली. तपासादरम्यान तीनचार जण ह्युंडाई कंपनीच्या कारमध्ये गोंडेगाव येथील आशिष पाटील याचा खून करून त्याला गाव कटंगी तिरोडी, जिल्हा बालाघाटला घेऊन गेल्याचे पोलिसांना समजले. कन्हान पोलिसांनी तत्काळ याची सूचना बालाघाट पोलिसांना दिली.
आरोपींचे वाहन रस्त्यात पंक्चर झाल्याने ते वाहन व मृतदेह तिथेच सोडून निघून गेले. बालाघाट पोलीस आरोपींचा माग घेत असल्याने त्यांचे वाहन दिसले. पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये मृतदेह आढळला. मृतदेहाची पाहणी केली असता मृतक आशिष पाटील असून तो गोंडेगाव येथील रहिवासी असल्याचे समजले. आरोपी व त्याच्या इतर साथीदारांनी कुठल्या कारणावरून आशिषचा खून केला, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.