केज (प्रतिनिधी) तालुक्यातील कासारी येथील कुटुंब लग्नासाठी बस्ता बांधण्यासाठी अहिल्यानगरला जात असताना केजपासून जवळच सांगवी (सारणी) पाटी येथे त्यांच्या जीपचा भीषण अपघात झाला. या अपघातात वधूपित्यासह एका नातेवाईक महिलेचा मृत्यू झाला, तर इतर नातेवाईक जखमी झाले. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी (दि.७) सकाळी ८ वाजता घडला. रामेश्वर शाहूराव डोईफोडे (वय ५०, रा. कासारी ता.केज) व उर्मिला श्रीराम घुले (वय ४५, रा. शिक्षक कॉलनी केज) अशी अपघाती मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. या अपघातात लक्ष्मण डोईफोडे व इतर जखमी झाले आहेत.
कासारी (ता. केज) येथील रामेश्वर शाहूराव डोईफोडे यांची मुलीचे लग्न २३ फेब्रुवारीला होणार होते. त्यासाठी ते शुक्रवारी सकाळी मुलीसह नातेवाईकांना घेऊन बस्ता बांधण्यासाठी अहिल्यानगरला निघाले होते. मात्र, सांगवी पाटीजवळील पुलावर पुढे वळण घेत असताना त्यांची जीप आणि टेम्पोची जोरदार धडक झाली. या अपघातात शिक्षक श्रीराम घुले यांच्या पत्नी ऊर्मिला घुले यांचा जागीच मृत्यू झाला. त्या नियोजित नवरदेवाच्या मावशी होत. अपघातस्थळी उपस्थित नागरिकांनी रामेश्वर डोईफोडे, लक्ष्मण डोईफोडे आणि इतर जखमींना तातडीने अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात हलवले. मात्र, उपचार सुरू असताना रामेश्वर डोईफोडे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
नवरदेवाच्या मावशीही मृत्युमुखी
लग्न अवघ्या काही दिवसांवर आलेले असताना वडिलांच्या निधनाने मुलीला मोठा धक्का बसला आहे. त्याच बरोबर अपघातात नवरदेवाच्या मावशीचेही निधन झाले. त्यामुळे दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली आहे. अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी तसेच रुग्णालयात नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती.