बुलडाणा (वृत्तसंस्था) समृद्धी महामार्गावर शनिवारी (1 जुलै) पहाटे खासगी बसच्या झालेल्या भीषण अपघातील मृतांची संख्या आता 26 वर गेली आहे. या अपघातात सुमारे २६ जणांचा होरपळून मृत्यू झाले होते. तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही बस नागपूरवरुन पुण्याला जात होती. याप्रकरणी सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकाला ताब्यात घेतलं आहे. तर उद्या सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान बुलढाण्यातच सामूहिक अंत्यसंस्कार करण्याबाबत नातेवाईकांचे एकमत झाल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांसोबत बोलताना दिली आहे.
नेमकं काय घडलं !
खासगी प्रवासी बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या बसमध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथील प्रवासी होती. विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस (एमएच २९ बीई १८१९) होती. बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर मध्यरात्री 1 ते 1.30च्या सुमारास रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. त्यामुळे बस पलटी झाली. बस पलटी झाल्याने दरवाजाही तुटला. त्यामुळे प्रवाशांना दरवाजातून बाहेर पडणं मुश्किल झालं. तितक्यात बसने पेट घेतला. त्यामुळे सर्वच प्रवाशी हादरून गेले. प्रवाशांनी एकच टाहो फोडला. त्यातच आग लागल्याने प्रवाशांनी जीव वाचवण्यसााठी जीवाच्या आकांताने आक्रोश केला. पण त्यांना कुणीही वाचवू शकले नाही.
सामूहिक अंत्यसंस्कार करण्याबाबत नातेवाईकांचे एकमत !
या घटनेत आतापर्यंत २६ प्रवाशांचा मृत्यू झालाय. या अनुषंगाने सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४०/२३ कलम २७९, ३०४, ३३७, ३३८, ४२७ आणि मोटर वाहन कायदा १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी चालकाला ताब्यात घेतलं आहे.अपघातानंतर सर्वात मोठे आवाहन मृतदेहांची ओळख पटवणे होते. त्याकरिता यंत्रणा तातडीने कामाला लागली आहे.
फॉरेन्सिक टीम डीएनए चाचणी करण्याकरिता प्रयत्न सुरू आहेत.तरी या कामाला चार ते पाच दिवस लागू शकतात, असे मंत्री गिरीश महाजन यांनी नातेवाईकांना सांगितले. त्यामुळे उद्या सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान बुलढाण्यातच सामूहिक अंत्यसंस्कार करण्याबाबत नातेवाईकांचे एकमत झाल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी नुकतेच पत्रकारांना बोलताना सांगितले.
अपघातातील 11 मृतांची ओळख पटली !
या अपघातील मृतदेह अक्षरश: ओळखू देखील येत नाहीत. त्यामुळे त्यांची ओळख पटविण्यासाठी डीएन किटही मागविण्यात आल्या. दरम्यान आता या अपघातातील 11 मृतांची ओळख पटली आहे. ओळख पटलेल्या मृत व्यक्तींमध्ये 1. कौस्तुभ काळे – नागपूर 2. कैलास गंगावणे – नागपूर 3. इंशात गुप्ता – नागपूर 4. गुडीया शेख – नागपूर 5 अवंती पोहनकर – वर्धा 6. संजीवनी गोटे अल्लीपूर, वर्धा 7. प्रथमेश खोडे – वर्धा 8. श्रेया वंजारी – वर्धा 9. वृषाली वनकर – वर्धा 10. ओवी वनकर – वर्धा 11. शोभा वनकर – वर्धा यांचा समावेश आहे.