बुलढाणा (वृत्तसंस्था) शहरातील राजू घाट येथे 8 जणांनी मिळून महिलेवर सामूहिक बलात्कार प्रकरणात मोठी धक्कादायक माहिती समोर येत आहे. पिडीत महिलेने तसं काहीच झालेलं नाही, तर वैद्यकीय तपासणी कशाला?, असा जबाब दिल्यामुळे पोलीसही चक्रावले आहेत.
या संदर्भात अधिक असे की, पीडित महिला ही तिच्या नातेवाईक व्यक्तीच्या एका मित्रासोबतच राजूर घाटातून दुपारी जात होती. दोघं जण राजूर घाटात सेल्फी काढण्यासाठी थांबले असता त्याठिकाणी आठ जण आले. पिडीतेच्या गळ्याला चाकू लावून आरोपींनी पीडित महिलेला घाटातील देवीच्या मंदिरा मागील दरीत नेले. तेथे आरोपींनी पीडितेवर आळीपाळीने सामुहिक बलात्कार केला. पीडित महिला व तिच्या समवेत असलेला व्यक्ती राजूर घाटात देवीच्या मंदिरानजीक सेल्फी काढण्यासाठी थांबले होते. या वेळी त्या ठिकाणी आठ जणांचा हा घोळका आला होता. त्यांनी पिडीतेच्या गळ्याला चाकू लावून सोबत असलेल्या व्यक्तीच्या खिशातील ४५ हजार रुपये लुटले. त्यानंतर महिलेला दरीत ओढत नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला होता.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आज (14 जुलै) सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याचसोबत प्रकरणाचे गांभीर्य पाहून एसपींनी दक्षता टीमच्या सदस्याला महिलेशी बोलून वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितले होते. मात्र महिलेने बलात्कार झालाच नाही तर मेडिकल कशाला, असे म्हटले आहे.
कथित पिडीत महिलेने सांगितले की, ती आणि तिचे नातेवाईक मंदिरापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका टेकडीवर बसले होते. तेवढ्यात 8 लोक तेथे आले आणि त्यातील 4 ते 5 लोकांनी त्या महिलेला आणि महिलेसोबत असलेल्या व्यक्तीला घेरले होते. या व्यक्तींची तोंड रूमालाने झाकली होती. या व्यक्तींनी आमच्याकडून 45 हजार रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर आम्हाला एका ठिकाणी बसवून त्यांचे फोटो काढून चाकूचा धाक दाखवून या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास तुमची खैर नाही, असे धमकावले होते.
याचसोबत पोलिसांनी महिलेला मेडिकप चेकअप करण्यास सांगितले होते. मात्र आरोपीने तिच्यावर बलात्कार केला नाही, त्यामुळे मेडिकल करण्याची गरज नाही, असे आता महिलेने वैद्यकीय अधिकाऱ्याला लेखी स्वरूपात लिहून दिले आहेत. दरम्यान, सामूहिक अत्याचाराच्या घटनेची माहिती समोर आल्यानंतर बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी बोराखेडी पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी तात्काळ बलात्काराचे गुन्हे दाखल करावे, आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी त्यांनी बोराखेडी पोलीस स्थानकात रात्री ठिय्या मांडला होता.