भुसावळ (प्रतिनिधी) बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला असून पाच संशयितांना शुक्रवारी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयितांना ७ घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीचा २ लाख ६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
तालुक्यात घरफोडीचे प्रमाण वाढल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथकाने कारवाई करत संशयित आरोपी शेख मुस्ताक शेख अनवर (वय-२३), सोहेल शेख आयुब ( वय १८), अफाताफ शेख समीउल्ला (वय-२२), जुबेर शेख कमरू (वय-२६) आणि एक अल्पवयीन मुलगा अशा ५ जणांना शुक्रवार ८ सप्टेंबर रोजी ताब्यात घेतले.
या चोरट्यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यातील ६ आणि भुसावळ तालुका पोलीस हद्दतील १ असे एकूण ७ घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून २ लाख ६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने, मोबाईल आणि गॅस सिलेंडर हस्तगत केला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता सर्वांना १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली तर अल्पवयीन आरोपीला बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.
या पथकाने केली कारवाई !
बाजारपेठ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील जोशी, विजय नेरकर, निलेश चौधरी, यासीन पिंजारी, उमाकांत पाटील, रमण सुरडकर, महेश चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, सचिन चौधरी, योगेश माळी, जावेद शहा, प्रशांत सोनार, पोलीस कॉन्स्टेबल अमर आठमडे यांनी केली आहे.