अडावद (प्रतिनिधी) चोपडा तालुक्यातील पंचक येथील एका घरातून अज्ञात चोरट्याने रोख रक्कमेसह सोने-चांदीचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात लताबाई मनोहर पाटील (वय ४५, रा. पंचक ता. चोपडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ९ मे २०२२ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात चोरटयाने घराचे मागील खोलीचे दरवाज्याची नटबोल्ट खोलून कडीकोंडा काढून घरातील कपाट तोडून ९४ हजार रुपये रोख, ३० हजार रुपये किंमतीचा ६ ग्रॅम वजनाची सोन्याचे मणी मंगळसूत्र, १२ हजार ६०० रुपये किंमतीचे १४ भार चांदीचे लहान कडे ६ नग, १५ हजार रुपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल, असा एकूण १ लाख ५२ हजार १०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उप निरीक्षक चंद्रकांत पाटील हे करीत आहेत.
















