नांदगाव : नांदगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील गंगाधरीजवळ राज्य परिवहन महामंडळाच्या मनमाड डेपोची बस व मारुती कार यांच्यामध्ये समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात आई, मुलगा, मुलगी या तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन वर्षीय चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की यात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.
मंगळवारी (दि. १४) सकाळी ११ वाजेच्या सुमारास मनमाडच्या दिशेने येणारी मनमाड डेपोची चाळीसगाव-मनमाड बस (क्रमांक एमएच १४ बीटी ४४९८) आणि चाळीसगावच्या दिशेने जाणारी कार (एमएच १५ सीडी २०५७) यांच्यात समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात कारमधील शुभम संतोष नलावडे (वय २५), वंदना संतोष नलावडे (वय ४८, दोघेही रा. शिंदे पळसे, ता. जि. नाशिक), कल्याणी मनोज शिंदे (वय २२, रा. माडसांगवी, ता. जि. नाशिक) हे जागीच ठार झाले, तर अवघा दोन वर्षीय चिमुकला वेदांत मनोज शिंदे गंभीर जखमी झाला आहे. त्यास अधिक उपचारासाठी मालेगाव येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
अपघाताची माहिती मिळताच आ. सुहास कांदे यांनी सर्व नियोजित कार्यक्रम स्थगित करून घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. नांदगाव पोलिसांनी देखील तातडीने पंचनामा करून रहदारी सुरळीत केली. पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संतोष बडे, हवालदार राजू मोरे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, बसचालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचे बसमधील प्रवाशांनी सांगितले.