मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात लसीचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. यातच आता लसींच्या पुरवठ्या संदर्भात केंद्राकडून महाराष्ट्राला सापत्न वागणूक मिळत असल्याचे आकडेवारीवरुन समोर आले आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकावर एक गंभीर आरोप केलाय. फक्त लसीबाबतच नाही तर अन्य वैद्यकीय उपकरणांबाबतही महाराष्ट्रासोबत दुजाभाव झाल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.
“महाराष्ट्राला फक्त लसी देण्यातच नाही तर कोरोना काळात महत्वाची वैद्यकीय उपकरणे देण्यातसुद्धा केंद्र सरकारने दुजाभाव केला आहे. लोकसभेतील आकडेवारीनुसार गुजरात आणि उत्तर प्रदेश राज्यात रुग्णसंख्येच्या व्यस्त पटीने N95 मास्क, पीपीई किट्स आणि व्हेंटीलेटर्स केंद्र सरकारने दिले आहेत”, असं ट्वीट करत पृथ्वीराज चव्हाण यांनी एक पत्रक सोबत जोडलं आहे. त्यात केंद्र सरकारकडून अन्य राज्यांना आणि महाराष्ट्राला देण्यात आलेली वैद्यकीय उपकरणांची आकडेवारी चव्हाण यांनी दिली आहे.
महाराष्ट्रासारख्या ज्या राज्यांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलाय त्या राज्यांना वाटपात प्राधान्य असायला हवं. पण तसं ते आकड्यांवरुन तरी दिसत नाही. ज्या राज्यांमध्ये सध्या कोरोना सर्वाधिक वाढतोय त्यात ना गुजरात आहे ना उत्तर प्रदेश पण तरीही सर्वाधिक साहित्य या राज्यांना आहेत. महाराष्ट्रसह ज्या पाच राज्यांमध्ये कोरोनाचं हे थैमान सुरु आहे, त्याच राज्यांमध्ये कोरोना डोसेसची संख्या वाढवायला हवीय.पण सध्या तरी कोरोना लसीच्या वाटपात ही काहीशी असमानता दिसत आहे. ज्याचा फटका महाराष्ट्रासारख्या राज्यांना बसत आहे.
प्रति १ हजार रुग्णांमागे कोणत्या राज्यांना काय मिळालं?
गुजरात – N95 मास्क – 9623, पीपीई किट – 4951, व्हेंटिलेटर्स – 13
उत्तर प्रदेश – N95 मास्क – 3916, पीपीई किट – 2446, व्हेंटिलेटर्स – 7
पश्चिम बंगाल – N95 मास्क – 3214, पीपीई किट – 848, व्हेंटिलेटर्स – 2
तामिळनाडू – N95 मास्क – 2213, पीपीई किट – 639, व्हेंटिलेटर्स – 2
महाराष्ट्र – N95 मास्क – 1560, पीपीई किट – 723, व्हेंटिलेटर्स – 2
केरळ – N95 मास्क – 814, पीपीई किट – 192, व्हेंटिलेटर्स – 1