मुंबई (वृत्तसंस्था) संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगालच्या निवडणूक निकाल लागल्यानंतर सर्व राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेने ममता बॅनर्जी यांचं कौतुक केलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने अत्यंत स्पष्ट बहुमत मिळविले. मोदी-शहा यांनी कृत्रिम ढगांचा गडगडाट केला, पण जमिनीवरील लाट ही प्रत्यक्षात ममता बॅनर्जी यांचीच होती. असं शिवसेनेनं म्हंटल.
शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून पश्चिम बंगालच्या निवडणुकीबाबत वक्तव्य करण्यात आले आहे. ‘देशात थैमान घालत असलेल्या महाभयंकर कोरोना महामारीस हरवायचे सोडून पंतप्रधान मोदींसह संपूर्ण केंद्र सरकार प. बंगालात ममता बॅनर्जी व त्यांच्या तृणमूल काँग्रेसला हरविण्यासाठी उतरले होते. प. बंगाल जिंकता यावे म्हणून तेथे मतदानाच्या आठ फेऱ्या लादण्यात आल्या. पण झाले काय? तृणमूल काँग्रेसने मोदी, शहांसह संपूर्ण केंद्र सरकार व भाजपला धूळ चारली आहे. प. बंगालात ममता बॅनर्जी यांनी विजयाची ‘हॅट्ट्रिक’ साधली. ममता दीदी २ मेनंतर घरी जातील अशा गर्जना केल्या गेल्या. ‘२ मई दीदी गई’ असा घोषा पंतप्रधान मोदी जाहीर सभांतून लावत होते. ममता यांना घरी बसविण्यासाठी भारतीय जनता पक्षाने पैसा, सत्ता व सरकारी यंत्रणेचा पूरेपूर वापर केला. तरीही ममता बॅनर्जी यांनी जिद्दीने विजय मिळविला. हा विजय म्हणजे मस्तवाल राजकारणास मिळालेली चपराक आहे. प. बंगालच्या निवडणुकीचे विश्लेषण एका वाक्यात करायचे तर भाजप हरला आणि कोरोना जिंकला’ अशी जळजळीत टीका शिवसेनेनं भाजपवर केली.
‘जय श्रीराम’चे नारे देण्यापासून ते ममतांना ‘बेगम ममता’ असे डिवचण्यापर्यंत हिंदू-मुसलमान मतांचे ध्रृवीकरण करण्याचा चोख हातखंडा प्रयोगही सफल झाला नाही. जेथे हिंदूंचे मताधिक्य आहे त्या मतदारसंघांतही ममता बॅनर्जी यांनी विजय मिळविला. या काळात पंतप्रधान मोदी हे बांगलादेशातही सैर करून आले. बांगलादेशचे निर्माते शेख मुजीबूर रेहमान यांना गांधी शांतता पुरस्कार जाहीर करून तो त्यांच्या कन्या बांगलादेशच्या विद्यमान पंतप्रधान शेख हसीना यांना प्रदान करून आले. त्यामुळे प. बंगालातील मुसलमान मते मिळतील असा कयास असावा, पण तसे घडले नाही. ममता बॅनर्जी यांचा पक्षही उभा-आडवा फोडला, पण तरीही विषम लढाईत तृणमूल काँग्रेसने मोदी-शहांच्या राजकारणास धूळ चारली. हे ऐतिहासिक व सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे’ असंही सेनेनं म्हटलं.
‘प. बंगालातील ममतांचा विजय हा मोदी-शहा-नड्डांचा दारुण पराभव आहे व या पराभवाची नैतिक जबाबदारी कोणी घ्यायची ते त्यांनीच ठरवायला हवे. देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री एखादी निवडणूक व्यक्तिगत प्रतिष्ठेची करतात तेव्हा जय-पराजयाचे श्रेय त्यांनीच स्वीकारायचे असते व राजकारणात तीच परंपरा आहे’, असा सल्लावजा टोलाही सेनेनं भाजपला लगावला.
देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री एखादी निवडणूक व्यक्तिगत प्रतिष्ठेची करतात तेव्हा जय-पराजयाचे श्रेय त्यांनीच स्वीकारायचे असते व राजकारणात तीच परंपरा आहे. पाच राज्यांतील निवडणूक निकालांमुळे देशात असे घडेल आणि तसे घडेल अशा पैजा लागल्या, पण नवे काय घडले? आसाम सोडले तर भारतीय जनता पक्षाने सर्वत्र मातीच खाल्ली आहे. केरळात डाव्यांनी पुन्हा सत्ता राखली. तेथे सामना काँग्रेसशी झाला. तामीळनाडूत ‘द्रमुक’ने सत्ता मिळवली. पुद्दूचेरी ही ३० आमदारांची विधानसभा. तेथे भाजपने विजय मिळवला. आसामात काँग्रेसने चांगली लढत देऊनही भाजपने पुन्हा विजय मिळविला. मग भाजपच्या हाती नव्याने काय लागले? असा सवालही शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केला आहे.