रावेर (प्रतिनिधी) आधार कार्ड व पॅन कार्ड लिंक करण्याचा बहाणा करून एका केळी गृप चालकाच्या बँक खात्यातील सुमारे ९८ हजार रुपये काढून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील नेहेते येथील नितीन प्रकाश पाटील हे आपल्या गजानन केला गृपच्या कार्यालयात बसले होते. या वेळी त्यांना अॅक्सीस बँकेचा लोगो असलेली लिंक पाठवून लागलीच दुसऱ्या मोबाईल क्रमांकाने अज्ञात व्यक्तीने फोन केला. यावेळी त्याने नितीन पाटील यांना सांगितले की, सर तुमचा पॅन कार्ड व आधार कार्ड केवायसी करायचे आहे, एवढे बोलून फोन कट केला. नितीन पाटील यांच्या लक्षात येताच त्यांनी अॅक्सीस बँकेत फोन करून बँकेतील माझे खाते ब्लॉक करण्यास सांगितले. मात्र. या वेळातच अज्ञात व्यक्तीने सुमारे ९८ हजार ६०० रुपये त्यांच्या खात्यातून काढून नितीन पाटील यांची फसवणूक केली. याबाबत त्यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.